बॉल-आउटचे थरारनाट

डरबान येथे झालेल्या त्या ड-गटातील लढतीत पाकिस्तानने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
बॉल-आउटचे थरारनाट

२००७चा पहिलावहिला टी-२० विश्वचषक म्हटला की, पाकिस्तानविरुद्धची अंतिम फेरी सर्वांनाच आठवते; मात्र त्याच पाकिस्तानविरुद्ध साखळी फेरीतसुद्धा भारताचा रोमहर्षक सामना झाला होता. टाय झालेल्या या लढतीचा निकाल बॉल-आउटद्वारे लावण्यात आला होता. आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला अवघे १४ दिवस शिल्लक असताना त्या विश्वचषकातील बॉल-आउटच्या थरारनाट्याचा घेतलेला हा धावता आढावा.

डरबान येथे झालेल्या त्या ड-गटातील लढतीत पाकिस्तानने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मोहम्मद आसिफच्या वेगवान माऱ्यापुढे भारताची भंबेरी उडाली. त्याने १८ धावांतच चार बळी पटकावले; मात्र रॉबिन उथप्पाचे अर्धशतक आणि महेंद्रसिंह धोनीच्या ३३ धावांच्या योगदानामुळे भारताने २० षट्कांत किमान ९ बाद १४१ धावांपर्यंत मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवातही खराब झाली; मात्र मिस्बाह उल हकने झुंजार अर्धशतक झळकावून पाकिस्तानच्या आशा कायम राखल्या. अखेरच्या सहा चेंडूंत पाकिस्तानला विजयासाठी १२ धावांची आवश्यकता असताना एकवेळ २ चेंडूंत १ धाव अशी अवस्था आली; मात्र श्रीशांतने पाचवा चेंडू निर्धाव टाकला, तर सहाव्या चेंडूवर मिस्बाह धावचीत झाला. त्यामुळे सामना टाय झाला.

अशा स्थितीत प्रथमच दोन गुण कोणाच्या खात्यात जाणार, हे ठरवण्यासाठी बॉल-आउटचा अवलंब करण्यात आला. बॉल-आउटमध्ये प्रत्येक संघातील पाच जणांना गोलंदाजीच्या अॅक्शनमध्ये स्टम्प्सवर निशाणा साधायचा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच चाहत्यांना अशाप्रकारचे नाट्य पाहायला मिळणार होते. भारताने सर्वप्रथम सुरुवात केली. वीरेंद्र सेहवागने अचूक यष्ट्यांचा वेध साधला. तर पाकिस्तानकडून यासिर अराफतला मात्र तसे करता आले नाही. हरभजन सिंगनेसुद्धा स्टम्प्सवर हीट साधून भारताची आघाडी २-० अशी वाढवली. तर उमर गुल अपयशी ठरल्याने पाकिस्तानवरील दडपण वाढले. भारताकडून रॉबिन उथप्पाने हॅट्‌ट्रिक साकारली. त्यामुळे पाकिस्तानला उर्वरित तिन्ही संधींमध्ये स्टम्प्सचा वेध साधणे गरजेचे होते; मात्र शाहीद आफ्रिदीने टाकलेला चेंडू यष्ट्यांना न लागताच गेला आणि भारतीय खेळाडूंसह अवघ्या देशाने एकच जल्लोष केला. भारताने गटात अग्रस्थान मिळवले आणि पुढे जाऊन विश्वचषकही उंचावला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदा त्या विजेतेपदाद्वारे प्रेरणा घेत दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावेल, अशी आशा तमाम क्रिकेटप्रेमी बाळगून आहेत. त्यांचे हे अभियान सुफळ संपूर्ण होणार की नाही, याचे उत्तर लवकरच मिळेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in