स्पेनमध्ये ११ डिसेंबरपासून नेशन्स कप हॉकीचा थरार सुरू होणार

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) आयोजित केलेल्या या स्पर्धेत आठ देश सहभागी होणार आहेत.
स्पेनमध्ये ११ डिसेंबरपासून नेशन्स कप हॉकीचा थरार सुरू होणार
Published on

स्पेनमधील व्हॅलेन्सिया येथे नियोजित नेशन्स कप महिला हॉकी स्पर्धेचा थरार ११ डिसेंबरपासून सुरू होणार असून ही स्पर्धा १७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. भारतीय महिला हॉकी संघ कॅनडाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) आयोजित केलेल्या या स्पर्धेत आठ देश सहभागी होणार आहेत.

सात दिवसांच्या स्पर्धेसाठी संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. भारत, कॅनडा, जपान आणि दक्षिण आफ्रिका हे अ गटात आहेत; तर कोरिया, इटली, यजमान स्पेन आणि आयर्लंड ब गटात आहेत. कॅनडानंतर भारतीय संघाचा सामना १२ डिसेंबर रोजी जपानशी आणि १४ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित करणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना १७ डिसेंबर रोजी होईल. भारतीय महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संघाने कांस्यपदक जिंकले होते. एफआयएच हॉकी प्रो-लीगमध्येही संघाने तिसरे स्थान पटकाविले.

logo
marathi.freepressjournal.in