वन-डे मालिकेचा थरार आजपासून सुरु होणार,टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा

या सामन्यात भारताच्या ‘प्लेइंग इलेव्हन’बाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे.
वन-डे मालिकेचा थरार आजपासून सुरु होणार,टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा

इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका २-१ ने जिंकल्यानंतर वन-डे मालिकेचा थरार मंगळवारपासून सुरू होत आहे. मंगळवारी तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील पहिला सामना ओव्हलवर होत आहे. इंग्लंडमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केलेली असल्याने या मालिकेतही टीम इंडियाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० मालिकेत इंग्लंडचा २-१ असा विजय मिळाल्याने टीम इंडियांचा आत्मविश्वास पूर्णत: उंचावलेला आहे; परंतु टी-२० मालिकेतील अपयशाचा वन-डे मालिकेत वचपा काढण्यास इंग्लंडचा संघ आसुसलेला असण्याची शक्यता नाकारूनही चालणार नाही.

या सामन्यात भारताच्या ‘प्लेइंग इलेव्हन’बाबत कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय संघ पहिल्या सामन्यात अनेक मोठ्या बदलासह मैदानात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

के एल राहुलच्या अनुपस्थितीत अनुभवी शिखर धवन हाच कर्णधार रोहितसोबत सलामीला येण्याची दाट शक्यता आहे. रोहित आणि शिखर ही सलामीची एक अत्यंत यशस्वी जोडी असल्याचे मानले जात आहे. नेहमीच्याच लयीत त्यांची कामगिरी अपेक्षित आहे.

आयपीएल २०२२ नंतर शिखर धवन प्रथमच भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. भारतीय संघाच्या प्लेइंग-११मधील विराट कोहलीचा फॉर्म मात्र अजूनही चिंतेचा विषय बनला आहे. फॉर्ममध्ये नसूनही कोहलीला तिसऱ्या स्थानावर पसंती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. याबरोबरच चौथ्या क्रमांकाचे स्थान कोणाला मिळते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सूर्यकुमार यादवचा सध्याचा फॉर्म पाहता तो प्रबळ दावेदार असेल.

मात्र टी-२० मालिकेप्रमाणेच वन-डे मालिकेतही ऋषभ पंत हा कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. पंत अर्थातच यष्टिरक्षक म्हणून खेळेल आणि तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल. हार्दिक पंड्यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले जाणार असल्याने तो पंतच्या आधी फलंदाजीला येतो की नंतर, हे सामन्याच्या स्थितीवर अवलंबून असेल, असेही सांगण्यात येते. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यात निवडीसाठी स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोन वेगवान गोलंदाजांवर प्रामुख्याने गोलंदाजीची धुरा राहील. शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल यांच्यावर फिरकी गोलंदाजीची मदार राहील.

यजमान इंग्लंडने नेदरलँडविरुद्धची मालिका ३-०ने जिंकली होती. पहिल्याच सामन्यात त्यांनी ४९८ धावा करून २३२ धावांनी विजय मिळविला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही या फॉरमॅटमध्ये जबरदस्त असणार आहे. टीम इंडियाला ही बाबही दुर्लक्षून चालणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in