यॉर्कर
कोरबो, लोडबो, जीतबो रे... म्हणजेच करूया, लढूया आणि जिंकूया असा नारा देत संपूर्ण हंगामात वर्चस्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १७व्या हंगामाचे जेतेपद काबिज केले. मुंबईकर कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने तिसऱ्यांदा करंडक उंचावला. २०१२ व २०१४ नंतर त्यांचे हे तिसरे आणि दशकभरातील पहिलेच आयपीएल जेतेपद ठरले. या संघाच्या यशामागे मार्गदर्शक गौतम गंभीर, मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांचे अमूल्य योगदान आहे.
कोलकाताने मिळवलेल्या तीन जेतेपदांमधील एक समान धागा म्हणजे गौतम गंभीर. कोलकाताच्या संघाने यापूर्वीची दोन जेतेपदे गंभीरच्या नेतृत्वाखाली मिळवली होती. यंदा तो मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून कोलकाता संघाशी जोडला गेला आणि हा संघ पुन्हा करंडक उंचावण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे गंभीरचे सर्वत्र कौतुक झाले. गंभीर या कौतुकास पात्रही आहे. त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकांना तो आवडत नसला तरी गंभीरच्या कामाच्या शैलीबाबत कुणालाच शंका नाही. खेळाडू म्हणून तो जसा छाप पाडायचा, तसाच प्रशिक्षक म्हणूनही तो तितकाच चोख आहे. गेल्या दोन हंगामात गंभीरच्या मार्गदर्शनाखाली लखनऊने दोन्ही वेळेस आयपीएलची बाद फेरी गाठली. यंदा मात्र कोलकाताचा संघमालक शाहरूख खानच्या विनंतीवर गंभीर पुन्हा कोलकाताकडे परतला. त्याच्या परतण्याने जणू संघाचे भाग्यही उजळले. सुनील नरिन हा गेल्या काही हंगामांपासून फक्त गोलंदाज म्हणून संघात होता, मात्र गंभीरने त्याचे सलामीवीरात रूपांतर केले. तसेच फिल सॉल्ट, आंद्रे रसेल याचा कोलकाताने संपूर्ण हंगामात सुरेख वापर केला. मिचेल स्टार्कला ज्यावेळी २४ कोटींची बोली लावून खरेदी करण्यात आले, तेव्हा अनेकांनी गंभीरने चूक केल्याचेही सांगितले. मात्र तोच स्टार्क अंतिम सामन्यात कोलकातासाठी मॅचविनर ठरला. आता गंभीरला भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठीही विचारणा करण्यात आल्याचे समजते.
एकीकडे गंभीरला विजयाचे श्रेय मिळत असताना संघाचे मुख्य प्रशिक्षक पंडित आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर हे मात्र पडद्यामागेच राहिले आहेत. परंतु, कोलकाताच्या खेळाडूंना या दोघांचे मोल निश्चितपणे ठाऊक आहे. “माझ्या डोक्यात केवळ एका व्यक्तीचाच विचार येत आहे, ज्याने कोलकाता संघातील भारतीय स्थानिक खेळाडूंना घडवले आहे. ती व्यक्ती म्हणजे अभिषेक नायर,” असे हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर कोलकाता संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती म्हणाला. मुख्य म्हणजे गंभीर व पंडित हे कदाचित फक्त २-३ महिन्यांसाठी कोलकाताच्या खेळाडूंसोबत कार्यरत असतील. नायर मात्र संपूर्ण वर्ष कोलकाता येथील अकादमीत अथवा मुंबईत विविध ठिकाणी युवा खेळाडूंवर मेहनत घेत असतो. नायरने रिंकू सिंह, वेंकटेश अय्यर, हर्षित राणा आणि वैभव अरोरा यांसारख्या खेळाडूंना तयार केले. अंक्रिश रघुवंशीनेही नायरकडे राहूनच क्रिकेटचे धडे गिरवले. दादरमधील शिवाजी पार्क, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये नायरने कोलकाता संघातील स्थानिक खेळाडूंबरोबर मिळून प्रचंड मेहनत घेतली. त्याच्या या मेहनतीचे फळ आज सगळ्यांच्या समोर आहे.
मुंबईकडून रणजीपटू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवणाऱ्या माजी अष्टपैलू नायरला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी संधी मिळाली नाही. मग खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्याने प्रशिक्षणात रस घेतला. दिनेश कार्तिकची कारकीर्द एका जागीच थांबली असताना, त्याने नायरची मदत घेतली. नायरच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकने आपल्या खेळातील आणि तंदुरुस्तीतील उणिवा दूर केल्या. परिणामी कार्तिकने गेल्या काही ‘आयपीएल’ हंगामांत दमदार कामगिरी केली आणि दरम्यानच्या काळात तो भारतीय संघाकडूनही खेळला.
आता वळूया पंडित यांच्याकडे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमधील भीष्माचार्य प्रशिक्षक म्हणून नावलाैकिक मिळवणाऱ्या पंडित यांनी मुंबई, विदर्भ, मध्य प्रदेश या संघांना रणजी करंडक उंचवून दिला आहे. कोलकाता संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली, त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. गतवर्षी कोलकाता सातव्या स्थानी राहिला. त्यातच गेल्या वर्षी कोलकाता संघाचा भाग राहिलेल्या डेव्हिड विजाने यंदाच्या हंगामापूर्वी पंडित यांच्या प्रशिक्षणाच्या शैलीवर टीका केली होती.
मात्र पंडित यांची शैली ‘आयपीएल’मध्येही यशस्वी होऊ शकते हे यंदा सिद्ध झालेच. “मध्य प्रदेश संघात पूर्वी आम्ही केवळ बाद फेरी गाठण्याचा विचार करायचो, पण पंडित सरांनी आम्हाला रणजी करंडक जिंकण्याचा विश्वास मिळवून दिला,” असे वेंकटेश अय्यरने एका मुलाखतीत सांगितले होते. याच वेंकटेशने ‘आयपीएल’च्या अंतिम लढतीत नाबाद अर्धशतकी खेळी करताना कोलकाता संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोलकाता संघासाठी अविस्मरणीय ठरलेल्या या हंगामात पंडित फारसे प्रकाशझोतात आले नसले, तरी त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले हे निश्चित. त्यामुळे या तिघांचेही कौतुक करावे तितके कमीच.