पॅरिस : विनेश फोगटची ऑलिम्पिक अपात्रतेविरोधातील याचिका क्रीडा लवादाच्या (कॅस) हंगामी विभागाने फेटाळून लावल्यानंतर भारतीय क्रीडाविश्वातून तिला मोठा पाठिंबा लाभला. संपूर्ण देश तुझ्या पाठीशी असल्याची भावना खेळाडूंकडून व्यक्त करण्यात आली.
“हा निर्णय अतिशय निराशाजनक आहे. मात्र, आपण याबाबतीत काहीच करू शकत नाही,” असे हॉकी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश म्हणाला. टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाने विनेशकडून पदक हिरावून घेतल्याची भावना व्यक्त केली. “तू आज जगभरात हिऱ्यासारखी चमकत आहेस,” असेही विनेशला उद्देशून बजरंग म्हणाला. तसेच त्याने विनेशचा यापूर्वीच्या असंख्य पदकांसह असलेला एक फोटो पोस्ट करून १५-१५ रुपयांमध्ये पदक खरेदी करून न्या, असे आवाहनही जनतेला केले होते. बजरंग, विनेश आणि साक्षी मलिक यांनी मिळून भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या शोषणाचे आरोप होते.
पॅरिस स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या हॉकी संघातील अन्य खेळाडूंनीही या निर्णयाबाबत निराशा व्यक्त केली. “खेळाडू इतक्या मोठ्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतात आणि त्यांना अशाप्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागणे हे खरेच दु:खद आहे,” असे जर्मनप्रीत सिंग म्हणाला.
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, हरभजन सिंग यांनीही विनेशला पाठिंबा दर्शवताना तिच्यासाठी किमान रौप्यपदकाची मागणी केली होती.