महिला हॉकी संघाने जेतेपद राखले! रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताची चीनवर १-० अशी मात; दीपिकाचा निर्णायक गोल

२० वर्षीय आक्रमणपटू दीपिका सेहरावत पुन्हा एकदा भारतासाठी धावून आली. तिने केलेल्या एकमेव निर्णायक गोलच्या बळावर भारतीय महिला संघाने बुधवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले.
महिला हॉकी संघाने जेतेपद राखले! रोमहर्षक अंतिम सामन्यात भारताची चीनवर १-० अशी मात; दीपिकाचा निर्णायक गोल
एक्स
Published on

राजगिर (बिहार) : २० वर्षीय आक्रमणपटू दीपिका सेहरावत पुन्हा एकदा भारतासाठी धावून आली. तिने केलेल्या एकमेव निर्णायक गोलच्या बळावर भारतीय महिला संघाने बुधवारी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. बिहारच्या राजगिर स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने चीनवर १-० अशी मात केली. त्यामुळे आशियात भारतातीच सत्ता असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

२०२३मध्येसुद्धा मायदेशातच ही स्पर्धा जिंकणाऱ्या भारताने एकंदर तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. यापूर्वी २०१६मध्ये भारतीय महिलांनी पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे सर्वाधिक वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवणाऱ्यांच्या यादीत भारताने दक्षिण कोरियाशी बरोबरी साधली. भारत, कोरिया यांनी प्रत्येकी ३ वेळा, तर जपानने २ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.

विशेष म्हणजे यावेळी सलिमा टेटेच्या कर्णधारपदाखाली खेळताना भारताने अखेरपर्यंत अपराजित राहून जेतेपद पटकावले. भारताने स्पर्धेत सलग सात लढती जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे आता पॅरिस ऑलिम्पिकला पात्र ठरण्यात आलेले अपयश पुसून काढत भारतीय महिला हॉकी संघाने नव्याने भरारी घेतली आहे. चीनचा महिला संघ हा पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मिळवलेले हे यश नक्कीच संस्मरणीय आहे.

११ नोव्हेंबरपासून बिहारमध्ये यंदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे आठवे पर्व खेळवण्यात आले. या स्पर्धेत भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया व थायलंड हे संघ सहभागी झाले होते. २०२३मध्ये रांची येथे भारताने या स्पर्धेचे आयोजन केले, तर यावेळी बिहारला हा मान मिळाला. आता २०२६मध्ये पुढील आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होईल. सप्टेंबरमध्ये झालेल्या पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतसुद्धा भारतानेच अजिंक्यपद मिळवले.

दरम्यान, बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारत व चीन या दोन्ही महिला संघांतील खेळाडूंनी झुंजार खेळ केला. मध्यांतरापूर्वी दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र दुसऱ्या सत्रात ३१व्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला व दीपिकाने त्याचा पूरेपूर लाभ उचलून अप्रतिम गोल नोंदवला. तिचा हा स्पर्धेतील तब्बल ११वा गोल ठरला. यानंतर चीनने बरोबरी साधण्यासाठी अथक परिश्रम घेतले. अखेरची काही मिनिटे शिल्लक असताना चीनने आक्रमण अधिक तीव्र केले, मात्र त्यामध्ये त्यांना यश लाभले नाही व परिणामी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने हे यश संपादन केले.

भारताने या स्पर्धेची सुरुवात साखळी फेरीत मलेशियाला ४-० अशी धूळ चारून धडाक्यात केली. त्यानंतर भारताने दक्षिण कोरियावर ३-२ अशी मात केली. मग दीपिकाच्या पाच गोलच्या बळावर भारतीय महिलांनी थायलंडचा १३-० असा फडशा पाडला. मग चीनवर भारताने ३-० असे वर्चस्व गाजवले. अखेरच्या साखळी लढतीत जपानला ३-० असे नेस्तनाबूत करून भारताने गटातील अग्रस्थानासह उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत मग भारताने जपानला २-० असे पराभूत केले व अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर आता बुधवारी चीनला पुन्हा नमवून भारताने विजेतेपद मिळवले. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जपानने मलेशियावर मात केली.

प्रत्येक खेळाडूला १३ लाखांचे बक्षीस

हॉकी महासंघाने प्रत्येकी ३, तर बिहार शासनाने प्रत्येक खेळाडूला १० लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच मुख्य प्रशिक्षकांना १० लाख, तर सहाय्यकांना ५ लाख रुपये देऊन गौरवण्यात येईल.

भारताच्या दीपिका सेहरावतने या स्पर्धेत सर्वाधिक ११ गोल केले. तिने ७ सामन्यांत ही कामगिरी नोंदवली. चीनच्या टॅनने ७ गोल झळकावले.

logo
marathi.freepressjournal.in