टीम इंडियाच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

सुमारे ११ महिन्यांपूर्वी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चुकांमधून टीम इंडियाने कोणताही धडा घेतला नाही
 टीम इंडियाच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित
Published on

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोर टप्प्यात भारताचे सलग दोन पराभव झाल्याने टीम इंडियाच्या निवडीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगामी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

सुमारे ११ महिन्यांपूर्वी यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतील चुकांमधून टीम इंडियाने कोणताही धडा घेतला नाही. आशिया चषकातही भारत याच टॉप ऑर्डरसह उतरला होता. सर्व सामन्यांमध्ये के एल राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा सलामीला आले आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आला. राहुलने चार सामन्यांत अवघ्या ७० धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १०४. ४७ इतका राहिला. कोहलीने १५४ धावा केल्या; पण त्याचा स्ट्राइक रेटही १२२.२२ इतकाच राहिला. रोहितला चारपैकी तीन सामन्यांत शानदार सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. भुवनेश्वर कुमार पुन्हा मोठ्या सामन्यात अपयशी ठरला. श्रीलंकेविरुद्ध त्याने चार षट्कात ३० धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळविण्यात अपयश आले. दुबईच्या डेड पिचवर ताशी १४०हून अधिक वेगाने गोलंदाजी टाकणारे गोलंदाज अधिक प्रभावी असल्याचे दिसून आले. पाकिस्तान आणि श्रीलंकेकडेही या वेगाने गोलंदाजी करणारे अनेक गोलंदाज होते. भारतीय संघातील बहुतांश वेगवान गोलंदाज ताशी १२० ते १३० किमी वेगाने चेंडू टाकणारे होते. त्यामुळे त्यांची गोलंदाजी प्रभावी ठरू शकली नाही. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना वगळता भारतीय गोलंदाजांना अपेक्षित अंतराने विकेट मिळविण्यात अपयश आले.

logo
marathi.freepressjournal.in