थुंकीला माफी नाही; आयसीसीने केले क्रिकेटच्या नियमांमध्ये आमूलाग्र बदल

भारतीय नियामक क्रिकेट मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली हा क्रिकेट समितीचा प्रमुख आहे
थुंकीला माफी नाही; आयसीसीने केले क्रिकेटच्या नियमांमध्ये आमूलाग्र बदल

बदलत्या काळानुसार क्रिकेटला अधिक मनोरंजक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आयसीसीने मंगळवारी जाहीर केलेल्या पत्रकानुसार क्रिकेटमध्ये चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळ अथवा थुंकीचा वापर करण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

क्रिकेट समितीने दिलेल्या सूचनांनुसार आयसीसीने संबंधित निर्णय घेतले. भारतीय नियामक क्रिकेट मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली हा क्रिकेट समितीचा प्रमुख आहे. मेरिलीबोन क्रिकेट क्लबनेसुद्धा आयसीसीला काही नियमांत बदल करण्याचे सुचवले होते. यापूर्वी कोरोनाच्या काळात चेंडूवर लाळ लावण्यास मनाई केली होती. आता मात्र यापुढे कधीही खेळाडूंना चेंडू चमकवण्यासाठी लाळ अथवा थुंकीचा वापर करता येणार नाही. त्यांना स्वत:च्या घामानेच चेंडू चमकवावा लागणार आहे.

त्याशिवाय आयपीएलमध्ये लागू करण्यात आलेले स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर्सचे नियम आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त, विनाकारण वेळ दवडणाऱ्यांसाठी आयसीसीने युक्ती शोधली असून गैरवर्तन करणाऱ्या खेळाडूंवरही कारवाई करण्यात येणार आहे.

खेळाडू चेंडूवर लाळ अथवा थुंकी लावू शकणार नाहीत. हा नियम गेल्या दोन वर्षांपासून लागू असून भविष्यातही तो कायम राहणार आहे.

फलंदाज झेलबाद झाल्यानंतर नवीन फलंदाज स्ट्राईकवर खेळायला येईल. बाद झालेल्या फलंदाजाच्या बाजू (क्रीज) बदलण्याचा किंवा न बदलण्याचा काहीच फरक पडणार नाही. यापूर्वी फलंदाज झेलबाद होण्यापूर्वी स्ट्राईक बदलल्यावर नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकवर यायचा.

विकेट पडल्यानंतर एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजाला दोन मिनिटांच्या आत स्ट्राइक घ्यावा लागेल. तर, टी-२० सामन्यात त्याची वेळ मर्यादा ९० सेकंद असेल. यापूर्वी एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात येणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन मिनिटे मिळायची. फलंदाज दोन मिनिटाच्या आत स्ट्राईक घेऊ न शकल्यास विरोधी संघाचा कर्णधार वेळ संपल्याची (टाईम आऊटची) मागणी करण्यास पात्र असेल.

एखाद्या गोलंदाजाने गोलंदाजीदरम्यान काही गैरवर्तन किंवा जाणूनबुजून हावभाव केले, तर पंच त्याच्यावर कारवाई करू शकतात. तसेच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला शिक्षा म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात पाच धावा जमा करू शकतात.

टी-२० प्रमाणेच आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षट्क वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या आत अतिरिक्त एक खेळाडू ठेवावा लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in