परिस्थिती लवकरच बदलेल पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची संधी मिळेल - नोव्हॅक जोकोविच

जोकोविचने नुकतेच विम्बल्डनवर आपले सातव्यांदा नाव कोरले.
परिस्थिती लवकरच बदलेल पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची संधी मिळेल - नोव्हॅक जोकोविच

परिस्थिती लवकरच बदलेल आणि मला पुढील वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने व्यक्त केली. जोकोविचचे लसीकरण झाले नसल्याने पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेतदेखील त्याला प्रवेश मिळण्याची शक्यता धूसर आहे.

जोकोविचने नुकतेच विम्बल्डनवर आपले सातव्यांदा नाव कोरले. याचबरोबर त्याने सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्यांच्या यादीत रॉजर फेडररला देखील मागे टाकले. आता त्याची नजर यूएस ओपन आणि राफेल नदलाच्या सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमावर आहे.

जोकोविचच्या मार्गात यूएस ओपन मिशनमध्ये कोरोनाची लस अडथळा ठरण्याची शक्यता आहे. जोकोविचने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास नकार दिला आहे. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियामधूनही आल्या पावली माघारी परतावे लागले होते. आता पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या यूएस ओपन स्पर्धेतदेखील जोकोविचला प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. जोकोविचने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की, सध्या मी अमेरिकेला जाऊ शकत नाही. मी सकारात्मक बातमीची वाट पाहत आहे. मात्र, यासाठी फार वेळ शिल्लक नाही. मला पुढे काय होणार माहिती नाही. आशा अजून जिवंत आहे. जोकोविच पुढे म्हणाला की, मला यूएस ओपन खेळायला आवडेल; मात्र जर खेळण्याची संधी मिळाली नाही, तर तो काही जगाचा अंत असणार नाही. यापूर्वीही मी ग्रँड स्लॅममधून माघार घेतली होती. माझ्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे हे फार महत्त्वाचे आहे. मी अजून दीर्घ काळ खेळू शकतो, त्यामुळे भविष्यातही मला चांगल्या संधी मिळतील. जोकोविचने विम्बल्डन ओपन स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या निक कर्गिओसचा चार सेटमध्ये पराभव करत आपले सातवे विम्बल्डन जिंकले. त्याची एकूण ग्रँड स्लॅमची संख्या आता २१ झाली आहे. तो सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विश्वविक्रम नावावर असणाऱ्या राफेल नदालच्या फक्त एक ग्रँड स्लॅम विजेतेपदाने मागे आहे. जोकोविच म्हणाला की, लोकं मला माझ्या विक्रमाबद्दल विचारत आहेत. माझा आवडता नंबर कोणता, माझे आवडते टायटल कोणते, याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी मी त्यांना माझे प्रेरणास्थान असलेल्या कोबे ब्रायंटचे एक वाक्य कोट करतो. माझे आवडते टायटल हे माझे पुढेच टायटल असेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in