राजकोट : ‘बॅझबॉल विरुद्ध स्पिनबॉल’ यांच्यातील द्वंद्व आता रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीवर आहे. त्यामुळे गुरुवारपासून राजकोटला सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कोणता संघ वर्चस्व गाजवणार, याकडे अवघ्या क्रीडा विश्वाचे लक्ष लागून आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणाऱ्या या कसोटीत दोन्ही संघांमध्ये एकप्रकारे आघाडीसाठी आटापिटा पाहायला मिळेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या कसोटीत एकवेळ १९० धावांची आघाडी घेऊनही सामना २८ धावांनी गमवावा लागला. मात्र दुसऱ्या लढतीत भारताच्या शिलेदारांनी झोकात पुनरागमन केले आणि इंग्लंडला १०६ धावांनी धूळ चारली. विराट कोहली, श्रेयस अय्यर, मोहम्मद शमी असे अनुभवी खेळाडू उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध नाहीत. तसेच के. एल. राहुलही या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे भारताच्या अंतिम संघात कुणाकुणाला संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरेल.
दुसरीकडे कर्णधार बेन स्टोक्स व प्रशिक्षक बँडन मॅकलम यांच्या इंग्लंडने या कसोटीसाठीही एक दिवस अगोदरच अंतिम ११ खेळाडू जाहीर करत आपण सज्ज असल्याचे दर्शवले आहे. राजकोटची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. भारत-इंग्लंड यांच्यात २०१६मध्ये येथे झालेल्या कसोटीत इंग्लंडच्या तिघांनी शतके झळकावली होती. भारताच्या रवींद्र जडेजाचे हे घरचे मैदान असून त्यानेच पत्रकार परिषदेदरम्यान पहिले दोन दिवस तरी खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांसाठी पोषक असेल, असे स्पष्ट केले. गेल्या १२ वर्षांत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे उभय संघांतील तिसरी कसोटी मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
रोहितकडून मोठी खेळी अपेक्षित
भारतीय संघातील प्रमुख फलंदाज रोहितला या कसोटीत मोठी खेळी करावी लागेल. त्याने दोन कसोटींच्या चार डावांत अनुक्रमे २४. ३९. १४. १३ अशा धावा केल्या आहेत. मुंबईकर यशस्वी जैस्वालने दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात द्विशतक, तर तिसऱ्या क्रमांकावरील शुभमन गिलने त्याच कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले. त्यामुळे त्यांच्याकडून कामगिरीत सातत्याची अपेक्षा आहे. असंख्य अनुभवी खेळाडू नसल्याने प्रामुख्याने आघाडीच्या तिघांवरच भारताची फलंदाजी अवलंबून आहे. तसेच जडेजा, अक्षर व अश्विन यांच्याकडूनही भारताला फलंदाजीत योगदान अपेक्षित आहे.
अश्विन एक पाऊल दूर
अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कसोटीतील ५०० बळींचा टप्पा गाठण्यापासून फक्त १ विकेट दूर आहे. ३७ वर्षीय अश्विनने ९७ कसोटींत ४९९ बळी मिळवले आहेत. अश्विन, जडेजा व अक्षर पटेल यांचे त्रिकुट फिरकीची धुरा वाहेल. तारांकित जसप्रीत बुमरा या मालिकेत भारतासाठी तारणहार ठरत आहे. त्याने २ कसोटींमध्ये सर्वाधिक १५ बळी मिळवले आहेत. मोहम्मद सिराज या लढतीसाठी परतल्याने बुमरा व सिराज वेगवान गोलंदाजीची बाजू सांभाळतील. भारताची मधली फळी अननुभवी असल्याने कुलदीपऐवजी अक्षरला त्याच्या फलंदाजीचा विचार करता प्राधान्य दिले जाऊ शकते.
जडेजाचे पुनरागमन पक्के; सर्फराझ, जुरेलचे पदार्पण?
३५ वर्षीय डावखुरा अष्टपैलू जडेजा स्नायूंच्या दुखापतीतून सावरला असून तो या कसोटीत खेळणार असल्याचे पक्के आहे. अशा स्थितीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला संघाबाहेर जावे लागेल. गोलंदाजीपेक्षा भारताची मधली फळी कोणत्या स्वरुपाची असेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे. श्रेयस, राहुल, विराट यांच्या अनुपस्थितीत रजत पाटिदार चौथ्या स्थानी खेळू शकतो. पाचव्या क्रमांकावर मुंबईकर सर्फराझ खानला पदार्पण दिले जाऊ शकते. तसेच सातत्याने सुमार कामगिरी करणाऱ्या के. एस. भरतऐवजी यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी देण्यात येणार आहे, असे समजते. सर्फराझ गेल्या दोन रणजी हंगामांत ७०च्या सरासरीने धावा करत आहे, तर २३ वर्षीय जुरेल हा उत्तर प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.
स्टोक्स @ १००
बेन स्टोक्सचा हा १००वा कसोटी सामना असून तो या लढतीत गोलंदाजीही करणार असल्याचे समजते. बुधवारी सरावात स्टोक्सने गोलंदाजीसुद्धा केली. दरम्यान, इंग्लंडने या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज मार्क वूडला पुन्हा संघात स्थान दिले असून ऑफस्पिनर शोएब बशीरला वगळण्यात आले आहे. त्यामुळे जेम्स अँडरसन व वूड वेगवान बाजू सांभाळतील. लेगस्पिनर रेहान अहमद व टॉम हार्टली असे फिरकीपटू इंग्लंडकडे आहेत. फलंदाजीच्या क्रमात इंग्लंडने कोणताही बदल केलेला नाही. अनुभवी जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांचे अपयश इंग्लंडला महागात पडत आहे. रूटने या मालिकेत आतापर्यंत फक्त ५२ धावा केल्या आहे. त्याउलट त्याने ६४ षटके गोलंदाजी केली आहे. विशेषत: बुमरासमोर रूट चाचपडत असल्याने त्यांच्यातील द्वंद्व पाहण्यात चाहत्यांना मजा येईल.
राजकोटवर झालेल्या आतापर्यंतच्या दोन कसोटींपैकी भारताने एक लढत जिंकली आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे.
भारत-इंग्लंड यांच्यातील ही १३४वी कसोटी असेल. आतापर्यंतच्या १३३ कसोटींमध्ये भारताने यांपैकी ३२, तर इंग्लंडने ५१ लढती जिंकल्या आहेत. उर्वरित ५० कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.
जेम्स अँडरसन कसोटीतील ७०० बळींचा टप्पा गाठण्यापासून फक्त ५ विकेट्स दूर आहे. अँडरसनच्या नावावर सध्या १८४ कसोटींमध्ये ६९५ बळी जमा आहेत.
रोहित शर्माला कसोटी कारकीर्दीतील ४,००० धावा पूर्ण करण्यासाठी १७३ धावांची आवश्यकता आहे. सध्या रोहितच्या नावावर ५६ कसोटींमध्ये ३,८२७ धावा जमा आहेत.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सर्फराझ खान, देवदत्त पडिक्कल, के. एस. भरत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमरा, रजत पाटिदार, मुकेश कुमार, आकाश दीप, सुंदर.
इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), बेन डकेट, झॅक क्रॉली, जो रूट, ओली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, जेम्स अँडरसन, मार्क वूड.