'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळाले आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान

सिंगापूरसाठी १४ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले.
'या' धडाकेबाज फलंदाजाला मिळाले आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना चाहत्यांची मने जिंकणारा धडाकेबाज फलंदाज टिम डेविडला आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघात स्थान लाभले आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने गुरुवारी भारत दौरा तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर केला.

सिंगापूरमध्ये जन्मलेल्या २६ वर्षीय डेविडने यापूर्वी २०१९-२० या काळात सिंगापूरसाठी १४ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व स्वीकारले. आयपीएलमध्ये डेविडने छाप पाडतानाच बिग बॅश लीगमध्येही चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्यामुळेच त्याला आरोन फिंचच्या नेतृत्वाखालील १५ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर तीन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी अनुभवी फलंदाज डेविड वॉर्नरला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी कॅमेरून ग्रीन फक्त भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाच भाग असेल.

१६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० विश्वचषक रंगणार असून गतवर्षी फिंचच्याच नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला नमवून जगज्जेतेपदावर प्रथमच नाव कोरले होते. त्यामुळे यंदाही ऑस्ट्रेलियाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांना भारत, इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड या संघांकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in