
कुस्तीपटूंचे दिल्लीत जंतर-मंतर वरील शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला पोलिसांनी चिरडल्यानंतर खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोठ्या कष्टाने ऑलिंम्पिकमध्ये कमावलेली मेडल हरिद्वार येथील गंगेत विसर्जीत करण्याचा कठोर निर्णय खेळाडूंनी घेतला आहे. सरकार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याने खेळाडूंकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभिषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर कुस्तीपटू आंदोलन करताना दिसत आहे. मात्र, केंद्रसरकारकडून याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसल्याने पैलवानांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने कमावलेले ऑलिंम्पिक पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक हे भारताचे दिग्गज कुस्तीपटू हरिद्वार येथील गंगा घाटावर दाखल झाले आहेत. आज ते आपले सर्व पदकं गंगेत विसर्जित करत आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने त्यांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते गंगेच्या किनारी दाखल झाले आहेत. यावेळी कुस्तीपटू भावूक झाल्याचं दिसून येत आहे.
अनेक कुस्तीपटू यावेळी ओक्साबोक्शी रडताना दिसत आहेत. त्यांच्या अनेक वर्षांची तपश्चर्या आज ते गंगेत विसर्जित करत असल्याने भावूक झाले आहेत. मोठ्या कष्टाने कमावलेली पदकं ते आज गंगेत विसर्जित करणार आहेत. बृषभूषण यांच्यावर महिला खेळाडूंचे लैगिंक शोषण केल्याचे गंभीर आरोप कुस्तीपटूंकडून करण्यात आले आहेत. या प्रकरणी सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं कुस्तीपटूंनी हा निर्णय घेतला आहे.
कुस्तीपटू अत्यंत शांततापुर्ण मार्गाने आपलं आंदोलन करत असून देखील दिल्ली पोलिसांकडून त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली गेल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलीस कशाप्रकारे कुस्तीपटूंचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडिओतून दिसून येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्तीपटूंच्या मागे उभे आहेत. मात्र, अजूनही सरकारकडून आरोपांची दखल घेतली गेली नसल्यानं कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत.