या पाकिस्तानी खेळाडूने मांडलं गौतम गंभीरबद्दल मत ; म्हणाला...

भारत-पाकिस्तान सामन्यात तुम्ही अनेकदा गौतम गंभीरला भडकवल्याचा तुमच्यावर आरोप केला जातो असा प्रश्न या खेळाडूला विचारण्यात आला होता.
या पाकिस्तानी खेळाडूने मांडलं गौतम गंभीरबद्दल मत ; म्हणाला...

पाकिस्तानमधील संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांच्यामधील वादविवाद व क्रिकेटच्या मैदानावरील नाते कुणापासून लपलेले नाही. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये अनेकवेळा जबरदस्त बाचाबाची झाली आहे. मग ती धावताना गंभीरला आफ्रिदीने कोपर मारणे असो किंवा गंभीरने आफ्रिदीशी केलेले गैरवर्तन असो. दोघांच्याही चर्चा सुरू झाल्या की, त्यांच्या क्लिप सोशल मीडियावर चांगल्याच व्हायरल होतात.

नुकताच आफ्रिदी एका यूट्यूब चॅनलवर मुलाखतीसाठी आला तेव्हा त्याने गंभीरसोबतच्या वादाबद्दल बोलण्यास साफ नकार दिला. आफ्रिदी म्हणाला की, काही सकारात्मक चांगल्या गोष्टींवर बोला. आफ्रिदीचं हे बोलणे चांगलंच चर्चेत आलं आहे. आफ्रिदी पाकिस्तानचा प्रसिद्ध यूट्यूबर मोमीन साकिबच्या 'हद कर दी' या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्याने कार्यक्रमाचा अँकर मोमीन आणि उपस्थित बसलेले प्रेक्षकांशी संवाद साधला होता.

यावेळी मोमीनने आफ्रिदीला गौतम गंभीरशी संबंधित असा एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान सामन्यात तुम्ही अनेकदा गौतम गंभीरला भडकवल्याचा तुमच्यावर आरोप आहे? असं त्यांने विचारलं. या प्रश्नाला उत्तर देत आफ्रिदी म्हणाला की, "हा एक खेळाचा भाग आहे. खेळताना असे काय तरी होणे सहाजिकचं आहे. प्रत्येक संघ दुसऱ्या संघातील खेळाडूंसोबत असं करतो. पण माझे आणि गंभीरचे प्रकरण सोशल मीडियावर वाढवून-चढवून दाखवण्यात आलं आहे." मात्र, यानंतर त्याने गंभीरवर केलेली टिप्पणी त्याच्या चाहत्यांना पटली नाही. तो म्हणाला, "गंभीरचं कॅरेक्टरच असं आहे. त्याचं स्वतःच्या संघातील सहकारी खेळाडूंशीही पटत नाही. त्याचे असेच संबंध आहेत. या शोमध्ये काही चांगल्या सकारात्मक मुद्द्यांवर बोला."

यानंतर मोमीन म्हणाला, चला, तुम्ही मला गौतम गंभीरबद्दल काही सकारात्मक गोष्टी सांगा? यावर आफ्रिदी म्हणाला, "भारतीय संघात मी त्याच्यासारखा सलामीवीर क्वचितच पाहिला आहे. त्याची टायमिंग उत्तम आहे. तो उत्कृष्ट सलामीवीर राहिला आहे." या शोमध्ये आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीतील अनेक क्षणांसह त्याच्या आवडत्या खेळाडूंसह आपलं मत मांडलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in