
येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने सोमवारी १८ सदस्यीय वरिष्ठ पुरुष हॉकी संघाची घोषणा केली आहे. मनप्रीत सिंगची कर्णधारपदी तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत जवळपास ७२ देशांतील पाच हजार ५४ खेळाडू सहभाग घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय संघाचा इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना सोबत पूल ‘ब’ गटामध्ये समावेश आहे. दोन वेळाचा रौप्यपदक विजेता भारतीय संघ ३१ जुलै रोजी घानाविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. गेल्या वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कास्यपदक जिंकून भारतीय संघाचे नेतृत्व करणारा मनप्रीत याही स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
अनुभवी गोलरक्षक पी आर श्रीजेश आणि दुखापतीतून परतलेला कृष्ण बहादूर पाठक यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. बचावाची जबाबदारी वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग आणि जरमनप्रीत सिंग यांच्यावर असेल. मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, आकाशदीप सिंग आणि नीलकांत शर्मा यांच्यावर मिडफिल्डची जबाबदारी राहील. मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, गुरजंत सिंग आणि अभिषेक यांना स्ट्रायकर म्हणून समाविष्ट करण्यात आहे.
२०२४ पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा असलेल्या हँगझोऊ आशियाई खेळांमध्ये आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कमी कालावधी असल्यामुळे हॉकी इंडियाने सुरुवातीला राष्ट्रकुल खेळांसाठी द्वितीय श्रेणीचा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चीनमधील कोविड-१९च्या परिस्थितीमुळे आशियाई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने एक मजबूत संघ निवडण्याचा निर्णय घेतल