प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज के. एस. भरतने (खेळत आहे १११ चेंडूंत नाबाद ७० धावा) दमदार अर्धशतक झळकावून भारतीय संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली. त्यामुळे भारताने लीस्टरशायरविरुद्धच्या चार दिवसीय सराव सामन्यातील पहिल्या दिवसअखेर ८ बाद २४६ धावा केल्या.
दिवसाचा खेळ संपला तेव्हा भरतच्या साथीला मोहम्मद शमी १८ धावांवर खेळत होता. वेगवान गोलंदाज लिस्टर शायरने (५/२१) केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे भारताची तारांबळ उडाली. कर्णधार रोहित शर्मा (२५), शुभमन गिल (२१), विराट कोहली (३३) चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलू शकले नाहीत. तर हनुमा विहारी (३), श्रेयस अय्यर (०), रवींद्र जडेजा (१३) यांनी निराशा केली.
१ जुलैपासून भारत-इंग्लंड यांच्यात निर्णायक पाचवी कसोटी खेळवण्यात येणार असून सध्या भारताचे जसप्रीत बुमरा, चेतेश्वर पुजारा, प्रसिध कृष्णा आणि ऋषभ पंत हे खेळाडू सराव म्हणून लीस्टरशायर संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.