न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाच्या या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती होण्याची शक्यता

शुभमन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचे तो सोने करीत आहे.
 न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाच्या या खेळाडूची कर्णधारपदी नियुक्ती होण्याची शक्यता
Published on

झिम्बाब्वेविरुद्धच्या वन-डे मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सलामीवीर शुभमन गिलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मोठे बक्षीस देण्याची शक्यता आहे. शुभमनची न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शुभमन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचे तो सोने करीत आहे. आधी वेस्ट इंडिज आणी आता झिम्बाब्वेविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली. निवड समिती शुभमनच्या या कामगिरीची दखल घेण्याच्या तयारीत असून पुढील महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका होणार आहे. त्यासाठी शुभमन गिलची वन-डे संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती होऊ शकते, असे सांगण्यात येते. या मालिकेसाठी शार्दूल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांचा भारतीय संघात समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

न्यूझीलंड विरुद्ध वन-डे मालिकेतील तीन सामने बंगळुरुमध्ये; तर तीन सामने चेन्नईमध्ये होणार आहेत.

भारतीय ‘अ’ संघाचे सर्व सामने कोविडमुळे स्थगित झाले होते. ते पुन्हा सुरू होत आहेत. भारतीय ‘अ’ संघातील कामगिरी लक्षात घेऊनच खेळाडूंना सीनियर संघात स्थान दिले जाते. सध्याच्या भारतीय सीनियर संघातील बहुतांश खेळाडू भारतीय ‘अ’ संघातूनच आले आहेत.

मुंबईचा डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीची भारतीय ‘अ’ संघात निवड होण्याची चिन्हे आहेत. रजत पाटीदारलासुद्धा संधी मिळू शकते. दरम्यान, न्यूझीलंडने या मालिकेसाठी टॉम ब्र्युसच्या नेतृत्वाखाली तगडा संघ निवडला आहे.

logo
marathi.freepressjournal.in