'या' खेळाडूने पटकावले भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान

मुंबईकर ३२ वर्षीय सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील निर्णायक तिसऱ्या लढतीत अर्धशतक झळकावले
'या' खेळाडूने पटकावले भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान
Published on

भारताचा धडाकेबाज आणि कलात्मक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या कारकीर्दीतील सर्वोत्तम फॉर्मात आहे. जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत बुधवारीच दुसऱ्या स्थानी मजल मारणाऱ्या सूर्यकुमारने आता एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थान पटकावले आहे.

मुंबईकर ३२ वर्षीय सूर्यकुमारने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील निर्णायक तिसऱ्या लढतीत अर्धशतक झळकावले. त्याशिवाय आफ्रिकेविरुद्धही पहिल्या सामन्यात कठीण खेळपट्टीवर अर्धशतक साकारून भारताला विजयी रेषा ओलांडून दिली. सध्या पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान ८६१ गुणांसह अग्रस्थानी असून सूर्यकुमार ८०१ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमारने बुधवारी वर्षभरात सर्वाधिक षटकार लगावणाऱ्यांच्या यादीतही अग्रस्थान पटकावले. सूर्यकुमारने २०२१मध्ये ४५, तर रिझवानने ४२ षटकार लगावले आहेत.

दरम्यान, सूर्यकुमारने यंदाच्या वर्षात आतापर्यंतच्या ३२ ट्वेन्टी-२० लढतींमध्ये ७३२ धावा केल्या आहेत. शिखर धवनने २०१८मध्ये ६८९ धावा काढल्या होत्या. मात्र आता सूर्यकुमार त्याच्यापुढे गेला आहे. नेत्रदीपक फटकेबाजी आणि मनगटांचा कलात्मकरित्या केलेला उपयोग यामुळे सूर्यकुमार चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून आगामी विश्वचषकासाठी मधल्या फळीचा त्याला आधारस्तंभ मानण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in