यंदा ११७ भारतीय खेळाडूंची पॅरिसवारी!!ऑलिम्पिकसाठी आयओएकडून पथकाची अंतिम यादी जाहीर; सोबतीला १४० सहाय्यकांचा चमू

भारताच्या ११७ खेळाडूंना यंदा पॅरिसवारी करण्याचे भाग्य लाभणार आहे. प्रतिष्ठेच्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) बुधवारी भारताच्या ११७ खेळाडूंची यादी जाहीर केली. तसेच या खेळाडूंसह १४० जणांचा सहाय्यक चमूही असेल.
यंदा ११७ भारतीय खेळाडूंची पॅरिसवारी!!ऑलिम्पिकसाठी आयओएकडून पथकाची अंतिम यादी जाहीर; सोबतीला १४० सहाय्यकांचा चमू
Twitter
Published on

नवी दिल्ली : भारताच्या ११७ खेळाडूंना यंदा पॅरिसवारी करण्याचे भाग्य लाभणार आहे. प्रतिष्ठेच्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) बुधवारी भारताच्या ११७ खेळाडूंची यादी जाहीर केली. तसेच या खेळाडूंसह १४० जणांचा सहाय्यक चमूही असेल.

२६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला प्रारंभ होणार असून यामध्ये २०६ देश सहभागी होतील. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ११७ खेळाडू तसेच १४० सहाय्यकांच्या पॅरिसला जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने १२६ खेळाडूंना पाठवले होते. त्यापैकी भारताने ७ पदके जिंकली. यामध्ये भालाफेकपटू नीरज चोप्राच्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचाही समावेश होता. यंदा भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरल्याने भारताच्या एकूण पथकाचा आकडा काहीसा कमी झालेला आहे. मात्र तरीही ११७ खेळाडूंच्या बळावर भारताला यंदा प्रथमच पदकांचे दशक गाठण्याची सुवर्णसंधी आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू भारतीय पथकाचे नेतृत्व करतील.

आयओएच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी यासंबंधी अधिक माहिती देतानाच भारतीय चमूला शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वीच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेलल्या भारतीय खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रत्यक्ष तसचे अप्रत्यक्षरित्या संवाद साधला. “यंदा ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक यश प्राप्त करण्यासाठी भारताचे खेळाडू सज्ज आहेत. भारताचे ११७ खेळाडूंचे पथक हे फक्त पदकाच्या दिशेने अग्रेसर आहे. संपूर्ण देशाचे आशिवार्द आपल्या खेळाडूंसह आहेत,” असे पी. टी. उषा म्हणाल्या.

दरम्यान, २९ वर्षीय गोळाफेकपटू आभा खतुआने ऑलिम्पिक पात्रता मिळवूनही पथकात नाव न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ती क्रमवारीद्वारे पात्र ठरली होती. तांत्रिक चुकीमुळे तिचे नाव या यादीत नाही की यामागे काही अन्य कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याविषयी चौकशी सुरू असल्याचे भारतीय पथकाचे प्रमुख आणी माजी नेमबाज गगन नारंगने सांगितले.

खेळाडूंची संख्या

ॲथलेटिक्स : २९

नेमबाजी : २१

हॉकी : १९

टेबल टेनिस : ८

बॅडमिंटन : ७

कुस्ती : ६

तिरंदाजी : ६

बॉक्सिंग : ६

गोल्फ : ४

टेनिस : ३

जलतरण : २

नौकानयन : ३

अश्वारोहण : १

ज्युडो : १

वेटलिफ्टिंग : १

एकूण : ११७

साताऱ्याच्या प्रवीणकडून पदकाची अपेक्षा

ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिकमध्ये उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी राज्यातील १२ खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. मिशन लक्ष्यवेध योजनेच्या माध्यमातून हे आर्थिक साहाय्य द्यावे, असा निर्णय नुकताच शासनाने घेतला असून या १२ खेळाडूंमध्ये सातारा जिल्ह्यातील तिरंदाज प्रवीण जाधव याचा समावेश आहे. प्रवीणने टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याच्याकडून यंदा पदकाची आशा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना तयारी करण्यासाठी यापूर्वी मिशन ऑलिम्पिक योजनेतून खेळाडूंना अर्थ साहाय्य देण्यात येत होते. आता मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत मिशन ऑलिम्पिक योजनेचे समायोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय, चिराग शेट्टी, अविनाश साबळे या खेळाडूंचाही सहाय्य केलेल्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in