सात्विकला दुखापत; सिंधूचीसुद्धा माघार! थॉमस-उबर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा दुय्यम संघ

२८ एप्रिलपासून चीन येथे थॉमस आणि उबर चषक या पुरुष-महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होईल. या स्पर्धेसाठी पुरुषांच्या गटात भारताची जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सात्विक-चिरागवर मदार होती. मात्र सात्विकच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही.
सात्विकला दुखापत; सिंधूचीसुद्धा माघार! थॉमस-उबर बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारताचा दुय्यम संघ

नवी दिल्ली : २०२२मध्ये भारतीय पुरुषांनी थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेचे ऐतिहासिक जेतेपद मिळवले होते. मात्र या जेतेपदात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीने यंदा या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याशिवाय महिलांमध्ये पी. व्ही. सिंधूसुद्धा उबर चषक स्पर्धेत खेळणार नाही.

२८ एप्रिलपासून चीन येथे थॉमस आणि उबर चषक या पुरुष-महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होईल. या स्पर्धेसाठी पुरुषांच्या गटात भारताची जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सात्विक-चिरागवर मदार होती. मात्र सात्विकच्या खांद्याला दुखापत झाल्याने तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. त्यामुळे नाइलाजास्तव चिरागलासुद्धा या स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे. अशा स्थितीत एकेरीत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय आणि लक्ष्य सेन यांच्यावरच भारताची भिस्त असेल.

दुसरीकडे महिलांमध्ये सिंधूने ऑलिम्पिक पात्रतेच्या स्पर्धेवर लक्ष देता यावे, म्हणून या स्पर्धेत न खेळण्याचे ठरवले आहे. सिंधू जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असून एप्रिलअखेरीस तिला क्रमवारीत अव्वल १६ खेळाडूंत स्थान टिकवणे गरजेचे आहे. उबर चषकाद्वारे तिला फारसे गुण मिळणार नाहीत. त्यामुळे तिने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो, तसेच गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांनीही या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

भारतीय पुरुषांनी एकदा थॉमस चषक उंचावला आहे, तर महिलांनी उबर चषकात १९५७, २०१४, २०१६ या वर्षी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आलेले नाही. आता सिंधूच्या अनुपस्थितीत अश्मिता छलिहा, अनमोल खर्ब यांच्यावर एकेरीत लक्ष असेल. त्याशिवाय दुहेरीत अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यात येईल, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेने स्पष्ट केले.

भारताचे संघ

  • थॉमस चषक (पुरुष) : एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, प्रियांशू राजवत, किरण जॉर्ज, एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला, साई प्रतीक.

  • उबर चषक (महिला) : अनमोल खर्ब, तन्वी शर्मा, अश्मिता छलिहा, इशारानी बरुहा, श्रुती मिश्रा, प्रिया कोंजेबम, सिमरन संघी, रितिका.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in