ज्यांना कसोटीत खेळण्याची इच्छा, त्यांनाच संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा! कर्णधार रोहितचे युवा खेळाडूंविषयी स्पष्ट मत

भारताने चौथ्या कसोटीत दमदार विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने विविध मुद्यांवर भाष्य केले
ज्यांना कसोटीत खेळण्याची इच्छा, त्यांनाच संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा! कर्णधार रोहितचे युवा खेळाडूंविषयी स्पष्ट मत
Published on

रांची : कसोटी हा क्रिकेटचा सर्वोत्तम प्रकार आहे. या प्रकारात यश मिळवायचे असेल, तर तुम्हाला संयम बाळगणे गरजेचे आहे. तुमच्यात ती भूक कायम असणे गरजेचे आहे. ज्या खेळाडूंमध्ये आम्हाला ही भूक दिसते त्यांना आम्ही पाठिंबा देतो, अशा सरळ शब्दांत भारताचा कर्णधार रोहित शर्माने संघ व्यवस्थापनाचा दृष्टिकोन स्पष्ट केला. तसेच रणजी स्पर्धांकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच तुम्हाला कसोटीत खेळण्याची इच्छा नाही, हे एकप्रकारे स्पष्ट होते, असेही रोहितने नमूद केले.

भारताने चौथ्या कसोटीत दमदार विजय मिळवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने विविध मुद्यांवर भाष्य केले. या मालिकेत भारताकडून आतापर्यंत सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, आकाश दीप यांनी पदार्पण करताना लक्षवेधी कामगिरी केली. तसेच यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल हे युवा खेळाडूही छाप पाडत आहेत.

“ज्यांच्यात कसोटी खेळण्याची भूक तसेच इच्छा आहे, ती त्यांच्या डोळ्यांतच दिसून येते. अशा खेळाडूंना संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा आहे. आयपीएल नक्कीच आम्हा सर्वांसाठी कौशल्य सिद्ध करण्याचे उत्तम मंच आहे. मात्र कसोटीत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला लाभत नाही. ज्यांना रणजी स्पर्धेत खेळण्यात रस नाही त्यांना कसोटीत तरी कशी संधी मिळू शकते,” असे रोहित म्हणाला.

इशान किशन व श्रेयस अय्यर या खेळाडूंनी विविध कारण देत रणजी स्पर्धेतील अखेरचा सामना खेळण्याचे टाळले. किशन टी-२० स्पर्धेत खेळण्याची तयारी करत होता. तर श्रेयस जायबंदी आहे, असे समजते. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी अशा खेळाडूंवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत वर्तवले होते. रोहितने परिषदेत कोणत्याही खेळाडूचे नाव न घेता संघात कोणत्या खेळाडूंना प्राधान्य दिले जाईल, हे स्पष्ट केले.

यशस्वी, सर्फराझ, जुरेलचे कौतुक

यशस्वी, सर्फराझ तसेच जुरेल यांनी या मालिकेत केलेल्या कामगिरीने मी प्रभावित झालो आहे. हे क्रिकेटपटू पुढील ५ ते १० वर्ष नक्कीच कसोटीत टिकून राहतील, असे दिसत असल्याचे रोहित म्हणाला. “दडपणाखाली संघातील युवा खेळाडूंनी जबाबदारी पेलली. यातील काही जणांचे या मालिकेत पदार्पण झाले आहे, तर काहींना यापूर्वी फक्त ३ ते ४ कसोटींचा अनुभव होता. मात्र त्यांच्या कामगिरीमुळे आम्हा सर्वांनाच प्रेरणा मिळाली आहे. कोणत्याही आव्हानात ते मागे न हटता त्यास सामोरे जाण्यास सज्ज आहेत. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे,” असे रोहितने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in