
जगभरातील क्रिकेट रसिकांची प्रतीक्षा संपली असून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत दुबई येथे भारत-पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना सुरू झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार मोहम्मद रिझवानने दुखापतग्रस्त फखर जमानऐवजी इमाम-उल-हकला संघात स्थान दिले आहे. फखर जमानची जागा घेणारा इमाम-उल-हक आणि बाबर आझम हे क्रीजवर आहेत. भारताकडून शमीने पहिला षटक टाकला आहे. त्याने एकूण ११ चेंडू टाकले आहेत. यामध्ये त्याने ५ वाईड चेंडू टाकले आहेत. सुरुवातीच्या ५ षटकात पाकिस्तानने २५ धावा केल्या आहेत.
भारताचा अंतिम संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव.
पाकिस्तानचा अंतिम संघ: इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.
गेल्या असंख्य वर्षांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीचे औत्सुक्य टिकून आहे. बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे या संघांमधील सामन्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धा अथवा आशिया चषकाच्या निमित्तानेच चाहत्यांना या दोन संघांमधील थरार पाहता येतो. त्यातच २०१७मध्ये झालेल्या अखेरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानने अंतिम फेरीत भारताला नमवले होते. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारे भारताचे शिलेदार त्या पराभवाचा वचपा घेण्यासही आतुर असतील. भारताने अ-गटातील पहिल्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारून धडाक्यात प्रारंभ केला. विराट कोहलीच्या कामगिरीवर या लढतीत चाहत्यांचे प्रामुख्याने लक्ष असेल.
या सामन्यात भारत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य असणार आहे. तर पाकिस्तानला त्याच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी यजमान पाकिस्तानला ही लढत जिंकणे अनिवार्य आहे.
खेळपट्टी आणि वातावरण
दुबईत सायंकाळच्या वेळेस दव जास्त येत नसल्याने प्रथम फलंदाजी करण्यास संघांचे प्राधान्य असेल. फिरकीपटू या खेळपट्टीवर प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३०० ते ३२० धावा केल्यास धावांचा पाठलाग करणे कठीण जाईल. या लढतीवर पावसाचे सावट अजिबात नाही. उलट खेळाडूंना दुबईतील उष्णतेचा त्रास होऊ शकतो. रविवारी ३५ अंशापर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे.