लिजेंड्स लीग क्रिकेटचा थरार यंदा येत्या १६ सप्टेंबरपासून सुरू होत असून हा सीझन विविध शहरांमध्ये खेळविण्यात येणार आहे. कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, कटक, जोधपूर येथे लढती रंगणार आहेत. प्ले–ऑफ फेरीच्या ठिकाणाची नावे नंतर जाहीर होणार आहेत.
कोलकात्यातील इडन गार्डन येथे १६ ते १८ सप्टेंबरपर्यंत तीन सामने खेळवण्यात येतील. त्यात भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षपूर्तीनिमित्त इंडियन महाराजा आणि वर्ल्ड जाएंट्स यांच्यात एका विशेष सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व मैदानांवर प्रत्येकी तीन सामने खेळवण्यात येतील; मात्र जोधपूर व लखनऊ येथे प्रत्येकी दोन सामने होतील.
लिजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी सांगितले की, “आम्ही ऑनलाइन तिकिटांसाठी लवकरच घोषणा करणार आहोत. नवीन फॉर्मेटमध्ये १० देशांमधील प्रख्यात खेळाडू सर्वोत्तम परफॉर्मन्स दाखवतील, अशी अपेक्षा आहे.” ते पुढे म्हणाले, “या सीझनसाठी पाकिस्तान-मधून एकही खेळाडू सामील करण्यात आलेला नाही. आम्ही लवकरच इतर काही आंतरराष्ट्रीय खेळाडू समाविष्ट करणार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “या सीझनचा अंतिम सामना डेहराडूनमध्ये खेळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” लिजेंड्स लीग क्रिकेटचे आयुक्त रवी शास्त्री म्हणाले, “आम्ही यंदाच्या सणासुदीच्या काळात क्रिकेट कार्निवल सादर करणार असून त्यात महान खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करताना पाहायला मिळणार आहेत.”
सामन्यांचे वेळापत्रक
कोलकाता : १६ ते १८ सप्टेंबर २०२२
लखनऊ : २१ ते २२ सप्टेंबर २०२२
नवी दिल्ली : २४ ते २६ सप्टेंबर २०२२
कटक : २७ ते ३० सप्टेंबर २०२२
जोधपूर : १ व ३ ऑक्टोबर २०२२
प्ले-ऑफ : ५, ७ अॉक्टोबर
(ठिकाणे अनिश्चित)
अंतिम सामना : ८ ऑक्टोबर
(ठिकाणे अनिश्चित)