टी-२० विश्वचषकाचा आजपासून थरार; पात्रता फेऱ्यांच्या लढतींनंतर ‘सुपर-१२’ची रंगत

देशातील अनेक खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्यांना विक्रम रचण्याचीही नामी संधी आहे.
टी-२० विश्वचषकाचा आजपासून थरार; पात्रता फेऱ्यांच्या लढतींनंतर ‘सुपर-१२’ची रंगत

ऑस्ट्रेलियात रविवारपासून टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू होत आहे. श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यातील पात्रता फेरीतील सामन्याआधी उद्घाटन सोहळा होणार आहे. खेळाडूंनी स्थानिक हवामानाशी जुळवून घेत जोरदार सराव केल्यामुळे अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे. पात्रता फेऱ्यांच्या लढतींनंतर ‘सुपर-१२’ची रंगत पाहायला मिळणार आहे.

भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, अफगाणिस्तान, नामिबिया, नेदरलँड्स, संयुक्त अरब अमिरात, आयर्लंड, स्कॉटलंड हे देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. प्रमुख देशातील अनेक खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्यांना विक्रम रचण्याचीही नामी संधी आहे.

रविवारपासून पात्रता फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. त्यानंतर मुख्य स्पर्धेस २२ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडसह अन्य सहभागी संघांपैकी पात्र ठरणाऱ्या इतर चार संघांमध्ये पात्रता फेरी खेळविण्यात येणार आहे. यामधून चार संघ पुढच्या फेरीत म्हणजेच सुपर-१२ फेरीत जातील.

स्पर्धेच्या मुख्य लढतीतील (सुपर-१२) पहिला सामना २२ ऑक्टोबर रोजी यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सिडनी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारताचा समावेश सुपर-१२ फेरीत ‘ब’ गटात आहे. या गटात भारताबरोबर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांचा समावेश आहे. याशिवाय पात्रता फेरीतील ‘अ’ गटातील दुसरा संघ (ए-२) आणि ‘ब’ गटातील पहिला संघ (बी-२) या गटात समाविष्ट होणार आहे.

भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारताचे फलंदाज सध्या अधिक लयीमध्ये दिसत आहेत. हार्दिक पंड्या, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

उपांत्य फेरी ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होईल. पहिला सामना सिडनी क्रिकेट स्टेडियमवर; तर दुसरा सामना अॅडलेडच्या ओव्हल स्टेडियमवर नियोजित आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in