

नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा शस्त्रक्रियेमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेतील तीन सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी मुंबईकर श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. तसेच श्रेयसचा एकदिवसीय संघातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यूझीलंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघांत ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल. त्यानंतर २१ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. ७ फेब्रुवारीपासून भारतात टी-२० विश्वचषकसुद्धा रंगणार आहे. तोपर्यंत तिलक तंदुरुस्त होईल, अशी आशा आहे. मात्र तसे न झाल्यास भारताला मोठा धक्का बसेल. तिलकच्या अनुपस्थितीत मुंबईकर श्रेयस अय्यरचा भारतीय संघात समावेश करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तसेच सर्फराझ खान, ऋतुराज गायकवाडचे पर्यायही उपलब्ध आहेत.
श्रेयसने विजय हजारे स्पर्धेतील अखेरच्या दोन साखळी सामन्यांत खेळताना फलंदाजीत चमक दाखवली. तसेच तंदुरुस्तीही सिद्ध केली. त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेत खेळणार आहे. मात्र श्रेयसचा तिलकच्या अनुपस्थितीत टी-२० संघातही समावेश केला जावा, अशी मागणी चाहते करत आहेत. कारण आयपीएलमध्ये श्रेयसने पंजाबचे नेतृत्व करताना छाप पाडली. संघाला अंतिम फेरीपर्यंतही नेले. तसेच देशांतर्गत स्पर्धेतही तो टी-२० प्रकारात सातत्याने धावा करत आहे. श्रेयसला ऋतुराज किंवा रियान पराग यांच्याकडून टी-२० संघातील स्थानासाठी कडवी झुंज मिळू शकते. गिल टी-२० संघाचा भाग नसल्याने त्याचेही मधल्या फळीत पुनरागमन होणार का, हे पाहणे रंजक ठरेल. मात्र तूर्तास श्रेयसचीच शक्यता जास्त आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी कसून सराव
भारताच्या खेळाडूंनी शुक्रवारी बडोदा येथे कसून सराव केला. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणारा शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा या सर्वांनी सरावात घाम गाळला. तसेच यशस्वी जैस्वालही सातत्याने फलंदाजी करताना दिसला. विराट व रोहित यांनी काही दिवसांपूर्वी विजय हजारे स्पर्धेतही छाप पाडताना शतके झळकावली. २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने दोघेही आशावादी आहेत. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा एकदा दोघांच्याही कामगिरीकडे लक्ष असेल.