वेलिंग्टन : न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. डिसेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर साऊदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे.
न्यूझीलंडचा ३५ वर्षीय गोलंदाज साऊदी म्हणाला की, इंग्लंडविरुद्ध हॅमिल्टन येथील घरच्या मैदानावरील तिसरी कसोटी ही त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील शेवटची कसोटी असेल. न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे स्वप्न होते. न्यूझीलंडसाठी १८ वर्षे खेळणे हा माझा सर्वात मोठा सन्मान आहे. परंतु आता या खेळापासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ असल्याचे साऊदी म्हणाला. त्यामुळे आता इंग्लंडविद्धच्या मालिकेनंतर साऊदी किवींच्या संघात दिसणार नाही.
कसोटी सामन्यांचे शतक
१०० हून अधिक कसोटी सामने खेळणाऱ्या सहा न्यूझीलंडच्या खेळाडूंपैकी तो एक आहे. साऊदीने १६१ एकदिवसीय आणि १२६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. २००८ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून साऊदीने आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. कसोटीत ३००, एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत १०० बळी घेणारा तो एकमेव खेळाडू आहे.