जेतेपदाचे दावेदार आज आमनेसामने! हरमनप्रीतच्या मुंबईची दिल्लीशी सलामी

महिलांची आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) शनिवारी रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील.
जेतेपदाचे दावेदार आज आमनेसामने! हरमनप्रीतच्या मुंबईची दिल्लीशी सलामी
Published on

वडोदरा : महिलांची आयपीएल म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) शनिवारी रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे दोन संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स संघ शनिवारी मेग लॅनिंगच्या दिल्ली कॅपिटल्सशी दोनहात करणार आहे.

शुक्रवारपासून डब्ल्यूपीएलच्या तिसऱ्या पर्वाला प्रारंभ झाला. वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने खेळवण्यात येत आहेत. त्यानंतर बंगळुरू, लखनऊ आणि मुंबई येथे या स्पर्धेचे सामने होतील. हरमनप्रीत आणि लॅनिंग यांच्यात भारत-ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करण्यापासून सुरू असलेली जुगलबंदी डब्ल्यूपीएलमध्येही कायम आहे. लॅनिंग आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली आहे. तसेच या स्पर्धेत हरमनप्रीतने लॅनिंगच्या संघावर वर्चस्व गाजवले आहे. २०२३मध्ये मुंबईने दिल्लीला नमवूनच विजेतेपद काबिज केले होते. दिल्लीने दोन्ही हंगामात अंतिम फेरी गाठूनही त्यांना जेतेपद मिळवता आलेले नाही. तर गतवर्षी मुंबईला एलिमिनेटरमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ यंदा सर्वस्व पणाला लावतील.

चार्लट एडवर्ड्स आणि झुलन गोस्वामी यांच्या मार्गदर्शनात खेळणाऱ्या मुंबईच्या संघात नॅट शीव्हर ब्रंट, २०२४मधील सर्वोत्तम खेळाडू ठरलेली अमेलिया कर, वेस्ट इंडिजची हायली मॅथ्यूज असे अनुभवी विदेशी खेळाडू आहेत. त्याशिवाय यास्तिका भाटिया, साईका इशाक, १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची सदस्य पारुणिका सिसोदिया, सजीवन सजना असे युवा भारतीय खेळाडूही मुंबईच्या ताफ्यात आहेत.

दुसरीकडे दिल्लीच्या संघात शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज असे प्रतिभावान भारतीय फलंदाज तसेच एलिस कॅप्सी, ॲनाबेल सदरलँड, मॅरीझेन काप असे विदेशी खेळाडूही आहेत. लॅनिंगचा अनुभवसुद्धा संघासाठी लाभदायी ठरेल. शिखा पांडे, तिथास साधू व राधा यादव यांच्यावर दिल्लीच्या गोलंदाजीची भिस्त आहे.

गुजरातच्या २०१ धावा

डब्ल्यूपीएलमध्ये शुक्रवारी उद्घाटनीय लढतीत गुजरात जायंट्सने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २० षटकांत ५ बाद २०१ धावा केल्या. कर्णधार गार्डनरने ३७ चेंडूंत ८ षटकारांसह नाबाद ७९ धावा फटकावल्या. बेथ मूनीने ५६ धावा केल्या. रेणुका सिंगने दोन बळी मिळवले.

वेळ : सायंकाळी ७.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी

logo
marathi.freepressjournal.in