तिसऱ्या विजयासाठी आज चढाओढ! पंजाब-हैदराबाद कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक
मुल्लानपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी होणाऱ्या लढतीत पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स हैदराबाद स्पर्धेतील तिसरा विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. मुल्लानपूर स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीत दोन्ही संघांचे कामगिरीत सातत्य राखण्याचे ध्येय असेल.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबने चारपैकी दोन लढती जिंकल्या असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहेत. दिल्लीविरुद्ध सलामीचा सामना जिंकल्यानंतर पंजाबला बंगळुरू व लखनऊकडून पराभव पत्करावा लागला. मात्र गुजरातला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्याने पंजाबचा आत्मविश्वास उंचावला असेल. त्यामुळे त्यांना कमी लेखणे हैदराबादला जोखमीचे ठरू शकते.
दुसरीकडे पॅट कमिन्सच्या हैदराबादनेसुद्धा चारपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत पाचवे स्थान टिकवले आहे. कोलकाताविरुद्ध रोमहर्षक लढतीत पराभव पत्करल्यावर हैदराबादने मुंबईला नमवले. गुजरातकडून मग दुसरा पराभव स्वीकारल्यावर हैदराबादने चेन्नईला धूळ चारली. त्यामुळे त्यांची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली आहे. मुल्लानपूर येथील स्टेडियमवर झालेल्या आतापर्यंतच्या एकमेव लढतीत पंजाबने दिल्लीविरुद्ध १७५ धावांचा पाठलाग केला होता. त्यामुळे येथे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे सोयीचे ठरेल.
क्लासेन, कमिन्सवर हैदराबादची मदार
कर्णधार आणि वेगवान गोलंदाज कमिन्स, सलामीवीर ट्रेव्हिस हेड, आफ्रिकेचा एडीन मार्करम आणि धोकादायक हेनरिच क्लासेन या विदेशी चौकडीवर हैदराबादचे भवितव्य अवलंबून आहे. अभिषेक शर्माही लयीत आहे. हैदराबादच्या आघाडीच्या चारही फलंदाजांनी स्पर्धेत किमान एक अर्धशतक झळकावले आहे. मात्र अब्दुल समदच्या जागी अन्य एकाला संधी देता येऊ शकते. गोलंदाजीत टी. नटराजन व भुवनेश्वर सातत्याने चमक दाखवत असून मयांक मार्कंडे फिरकीची धुरा वाहेल. ग्लेन फिलिप्स, मार्को यान्सेन यांना मात्र पुन्हा संघाबाहेर रहावे लागेल असे दिसते. कमिन्सचे नेतृत्व संघासाठी लाभदायी ठरत असून तो योग्यवेळी गोलंदाजीतही छाप पाडत आहे.
धवन लयीत; शशांककडे लक्ष
धवन गेल्या सामन्यात स्वस्तात बाद झाला असला तरी त्याने यापूर्वीच्या तीन सामन्यांत अनुक्रमे २२, ४५, ७० अशा धावा करून पंजाबला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्याशिवाय जॉनी बेअरस्टोलासुद्धा सूर गवसला आहे. त्याशिवाय गेल्या सामन्यात २०० धावांचा पाठलाग करण्यात मोलाची भूमिका बजावणारा शशांक सिंग पुन्हा एकदा केंद्रस्थानी असेल. लियाम लिव्हिंगस्टोन, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा यांचे अपयश पंजाबला महागात पडत आहे. गोलंदाजीसुद्धा पंजाबसाठी चिंतेचा विषय असून हर्षल पटेल अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. कॅगिसो रबाडा, सॅम करन व अर्शदीप सिंग या वेगवान त्रिकुटावर पंजाबच्या आशा आहेत.
ब्रूकच्या जागी विल्यम्स दिल्लीकडे
वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतलेल्या इंग्लंडच्या हॅरी ब्रूकऐवजी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाड विल्यम्सची दिल्ली कॅपिटल्स संघात निवड झाली आहे. ३० वर्षीय विल्यम्सला ५० लाख रुपयांत दिल्लीने खरेदी केले आहे. विल्यम्सने २ कसोटी, ४ एकदिवसीय आणि ११ टी-२० सामन्यांत आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र आयपीएलमध्ये तो प्रथमच खेळणार आहे.