लिटिल मास्टरचे ‘अवघे पाऊणशे वयोमान’ सुनील गावस्कर यांचा आज ७५वा वाढदिवस

जगातील आग ओकणाऱ्या, आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्याच्या मनात धडकी भरवणाऱ्या वेगवान तोफमाऱ्यासमोर धीरोदात्तपणे उभे राहणारे आणि हिरवळीच्या मैदानावर आपल्या बॅटच्या जोरावर धावांचा डोंगर उभा करणारे लिटिल मास्टर अर्थात सुनील गावस्कर आज आपला ७५वा वाढदिवस साजरा करत आहेत.
लिटिल मास्टरचे ‘अवघे पाऊणशे वयोमान’ सुनील गावस्कर यांचा आज ७५वा वाढदिवस
Published on

क्रीडा प्रतिनिधी/ मुंबई

जगातील आग ओकणाऱ्या, आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्याच्या मनात धडकी भरवणाऱ्या वेगवान तोफमाऱ्यासमोर धीरोदात्तपणे उभे राहणारे आणि हिरवळीच्या मैदानावर आपल्या बॅटच्या जोरावर धावांचा डोंगर उभा करणारे लिटिल मास्टर अर्थात सुनील गावस्कर आज आपला ७५वा वाढदिवस साजरा करत आहेत.

आपल्या बॅटने क्रिकेटचे मैदान गाजवणारा आणि नंतर आपल्या सुमधुर वाणीने, समालोचनाने तमाम क्रिकेटशौकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गावस्कर आपल्या अमृतकाळात पदार्पण करत आहेत. मैदानात किंवा समालोचन कक्षात एखाद्या तरुणाप्रमाणे कॉमेंट्री करणाऱ्या गावस्कर यांच्याकडे पाहून त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. १९७०-८०च्या दशकात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलियाचे रांगडे वेगवान गोलंदाज आग ओकत असताना, त्यांचा सामना करताना भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडत असे. पण विनाहेल्मेट फलंदाजी करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी याच गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.

१९७१ साली गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले, हा सामना भारताने सात विकेट्स राखून जिंकला आणि भारताने मालिकाही खिशात घातली. पदार्पणाच्या मालिकेत गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या, आजतागायत हा विक्रम कुणालाही मोडता आलेला नाही. ज्या काळी फक्त मैदानावर उभे राहणे आणि आपल्या शरीराचे अवयव शाबूत ठेवणे एवढेच कसब असायचे, त्या काळात गावस्कर यांनी कसोटीत ५१.२२च्या सरासरीने ३४ शतकांसह १०,१२२ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारांपेक्षा जास्त धावा करणारा पहिला फलंदाज, डॉन ब्रॅडमन यांच्या २९ कसोटी शतकांचा विक्रम मोडणारा पहिला फलंदाज, तसेच ३४ शतके करणारा पहिला फलंदाज, अशी अनेक विक्रमशिखरे त्यांनी सर केली.

धाडसी, सडेतोड व्यक्तिमत्त्व

क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेरही धाडसी म्हणून गावस्कर यांची ओळख आहे. गावस्कर कधीही हेल्मेट घालून खेळले नाहीत, ते जी ‘स्कल कॅप’ घालून खेळायचे, त्यावर किंवा डोक्यावर जर एखाद्या वेगवान गोलंदाजाचा चेंडू जोरात आदळला असता, तर तिथेच त्यांचा जीव गेला असता, हे त्यांचे मैदानावरचे धाडस. आपल्या सरळ वाणीने समालोचन करताना ते भारतीय खेळाडूंच्या चुका जगासमोर आणण्यात कुठेही कमी पडत नाहीत. एकप्रकारे सध्याच्या खेळाडूंना आरसा दाखवण्याचे काम गावस्कर नित्यनेमाने करत आलेत आणि करत राहतीलही. त्याचबरोबर १९९२ मध्ये मुंबईत झालेल्या दंगलीनंतरचा तणाव शांत करण्यासाठी गावस्कर निधड्या छातीने रस्त्यावर उतरले होते, हे त्यांचे मैदानाबाहेरचे धाडस. अशा या क्रिकेटच्या महानायकाला अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कुर्निसात.

logo
marathi.freepressjournal.in