बंगळुरू : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिले दोन्ही सामने जिंकून विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बुधवारी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या तिसऱ्या सामन्यातही वर्चस्व गाजवून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन करण्याचे भारतीय संघाचे ध्येय असेल. जूनमध्ये अमेरिका व वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचा हा अखेरचा टी-२० सामना असेल, हे विशेष.
भारताने दोन्ही सामन्यांत प्रत्येकी ६ गडी राखून विजय मिळवला. आता बंगळुरूमध्येही चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. मुंबईकर शिवम दुबेने सलग दोन अर्धशतकांसह गोलंदाजीतही योगदान देताना भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे हार्दिक पंड्या तंदुरुस्त न झाल्यास दुबे विश्वचषकासाठी संघात स्थान मिळवू शकतो. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर जवळपास दोन महिने आयपीएल असेल. मग जूनच्या पहिल्या आठवड्यात विश्वचषक सुरू होईल.
दुसरीकडे इब्राहिम झादरानच्या अफगाण संघाकडून सांघिक कामगिरी झालेली नाही. गुलाबदीन नईब, मोहम्मद नबी यांनी आतापर्यंच चमक दाखवली. रशिद खानची उणीव त्यांना भासत असून गोलंदाजीत मुजीब उर रहमान, फझलहक फारुकीकडून त्यांना अपेक्षा आहेत. श्रीलंका व आयर्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेपूर्वी लय मिळवण्याचा अफगाणिस्तानचा प्रयत्न असेल.
रोहित धावांचे खाते उघडणार?
कर्णधार रोहित या मालिकेतील दोन्ही सामन्यांत शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या लढतीत तो चमक दाखवेल, अशी आशा आहे. फलंदाजीत यशस्वी जैस्वाल, विराट कोहली व दुबे यांच्यावर भारताची भिस्त आहे. तसेच रिंकू सिंग, जितेश शर्मा फटकेबाजी करण्यात पटाईत आहेत. डावखुरा अक्षर पटेल या मालिकेत भारतासाठी हुकमी एक्का ठरत आहे. संघात बदल करून संजू सॅमसन, आवेश खान व कुलदीप यादव यांच्यापैकी कुणाला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल.