
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना मंगळवारी होत असून भारताने मालिका २-० ने आधीच खिशात घातलेली असल्याने आघाडी वाढवून पाहुण्यांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील; तर शेवट करण्याचा प्रयत्न पाहुणा संघ करील. दक्षिण आफ्रिकी फलंदाजांचा भन्नाट फॉर्म पाहता भारतीय गोलंदाजांची पुन्हा कसोटी लागणार आहे.
या सामन्यात भारताच्या काही महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. यात विराट कोहलीबरोबरच कर्णधार रोहित शर्माचादेखील समावेश असू शकतो, असे सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रीकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने १६ धावांनी विजय मिळवत मालिका जिंकून इतिहास रचला. त्यामुळे मालिकेतील शेवटचा सामना हा फक्त औपचारिक राहिला आहे. या सामन्यात उपकर्णधार के. एल राहुललाही विश्रांती मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज व उमेश यादव यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संधी मिळालेली नाही. त्यामुळे आता मालिका जिंकल्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
ॠषभ पंतला अद्याप संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला संधी मिळण्याची चिन्हे आहेत.
विराटला विश्रांती
या सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहली खेळताना दिसणार नाही. टी-विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराटने दोन दिवस घरी व्यतित करण्याचा निर्णय घेतला. त्याची ही इच्छा संघ व्यवस्थापनाने मान्य केली. विराट सोमवारी मुंबई विमानतळावर दिसला होता. गुवाहाटी येथे झालेल्या सामन्यात विराटने नाबाद ४९ धावांची खेळी केली.
संघ घरी न जाता ऑस्ट्रेलियाला होणार रवाना
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया ६ ऑक्टोबर रोजी रवाना होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्यानंतर खेळाडूंना घरी न जाता थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे.