मुंबईची आज विदर्भाशी गाठ; मुश्ताक अली स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून बंगळुरूत प्रारंभ

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला बुधवारपासून बंगळुरूत प्रारंभ होणार आहे. टी-२० प्रकारातील प्रतिष्ठित अशा या देशांतर्गत स्पर्धेत बलाढ्य मुंबईसमोर विदर्भाचे कडवे आव्हान असेल.
मुंबईची आज विदर्भाशी गाठ; मुश्ताक अली स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला आजपासून बंगळुरूत प्रारंभ
Published on

बंगळुरू : सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीला बुधवारपासून बंगळुरूत प्रारंभ होणार आहे. टी-२० प्रकारातील प्रतिष्ठित अशा या देशांतर्गत स्पर्धेत बलाढ्य मुंबईसमोर विदर्भाचे कडवे आव्हान असेल. त्याशिवाय बंगाल विरुद्ध बडोदा यांच्यातील सामन्यात मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या यांच्यातील जुगलबंदी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

२३ नोव्हेंबरपासून भारतातील विविध ठिकाणी सुरू झालेल्या या स्पर्धेचे यंदा १७वे पर्व आहे. ३८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ५ गट करण्यात आले होते. त्यानंतर आता उपांत्यपूर्व फेरीतील आठ संघ जेतेपदाच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने इ-गटात २० गुणांसह अग्रस्थान काबिज केले, तर जितेश शर्माच्या कर्णधारपदाखाली विदर्भाने ड-गटात अग्रस्थान मिळवले. त्यामुळे अलूरच्या मैदानात उभय संघांत कडवी झुंज अपेक्षित आहे.

दुसरीकडे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर बडोदा व बंगाल आमनेसामने येतील. शमीने उपउपांत्यपूर्व लढतीत अष्टपैलू चमक दाखवून आंध्र प्रदेशला नमवण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात त्याची निवड होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बडोद्याने ब-गटात सर्वाधिक २४ गुणांसह अग्रस्थान पटकावले. त्यामुळे हार्दिक व कर्णधार कृणाल या पंड्या बंधूंविरुद्ध शमीची गोलंदाजी पाहताना मजा येईल.

अन्य दोन उपांत्य लढतींमध्ये मध्य प्रदेश विरुद्ध सौराष्ट्र आणि दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश एकमेकांशी दोन हात करतील. शुक्रवारी उपांत्य सामने रंगणार असून रविवारी चिन्नास्वामीवरच अंतिम लढत खेळवण्यात येईल. या स्पर्धेनंतर विजय हजारे स्पर्धेला प्रारंभ होईल.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने

मध्य प्रदेश वि. सौराष्ट्र (सकाळी ९ वाजल्यापासून)

बंगाल वि. बडोदा (सकाळी ११ वाजल्यापासून)

मुंबई वि. विदर्भ (दुपारी १.३० वाजल्यापासून)

दिल्ली वि. उत्तर प्रदेश (दुपारी ४.३० वाजल्यापासून)

थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in