यष्टिरक्षकांच्या द्वंद्वात कोण मारणार बाजी? पंतच्या दिल्ली कॅपिटल्ससमोर आज सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान

आयपीएलच्या १७व्या हंगामाला दमदार सुरुवात झाली असून या स्पर्धेद्वारे २६ वर्षीय पंतचेसुद्धा पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०२२मध्ये अपघात झाल्यानंतर १५ महिन्यांनी पंत पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत मैदानात उतरला.
यष्टिरक्षकांच्या द्वंद्वात कोण मारणार बाजी? पंतच्या दिल्ली कॅपिटल्ससमोर आज सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान
Published on

जयपूर : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी रंगणाऱ्या सामन्यात भारताच्या दोन यष्टिरक्षकांमधील द्वंद्व चाहत्यांना पाहायला मिळेल. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्ससमोर ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असेल.

आयपीएलच्या १७व्या हंगामाला दमदार सुरुवात झाली असून या स्पर्धेद्वारे २६ वर्षीय पंतचेसुद्धा पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०२२मध्ये अपघात झाल्यानंतर १५ महिन्यांनी पंत पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत मैदानात उतरला. त्याने १३ चेंडूंत १८ धावा केल्या. तसेच यष्टिरक्षणातही छाप पाडली. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने भारतीय संघात स्थान मिळवायचे असल्यास पंतला आयपीएलचा पूरेपूर वापर करावा लागेल. मात्र पंतच्या दिल्ली या संघाला सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ते पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहेत.

दुसरीकडे सॅमसनच्या राजस्थानने पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सवर मात केली. स्वत: सॅमसनने त्या लढतीत दमदार नाबाद ८२ धावांची खेळी साकारून सूर गवसल्याचे संकेत दिले. त्यामुळे राजस्थानच्या संघाचे या लढतीसाठीही पारडे जड मानले जात असून घरच्या मैदानात खेळण्याचा ते लाभ उचलतील. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक असून २०० धावांचा बचाव करणेही येथे कठीण जाऊ शकते.

दिल्लीला अक्षर, मार्शकडून अपेक्षा

दिल्लीच्या फलंदाजीची भिस्त पंतसह प्रामुख्याने डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श या ऑस्ट्रेलियन सलामी जोडीवर असेल. त्याशिवाय पंत, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स यांच्याकडून फलंदाजीत योगदान अपेक्षित आहे. मात्र गोलंदाजी ही दिल्लीची कमकुवत बाजू असून इशांत शर्मा या लढतीसाठी तंदुरुस्त आहे की नाही, हे अद्याप समजलेले नाही. अशा स्थितीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव व डावखुरा अक्षर पटेल यांना कामगिरी उंचवावी लागेल. रिकी भूई, सुमित कुमार या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकलेल्या खेळाडूंकडेही लक्ष असेल.

गोलंदाजी राजस्थानची ताकद

ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर यांसारखे डावखुरे वेगवान गोलंदाज आणि रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल असे अनुभवी फिरकीपटू राजस्थानच्या ताफ्यात असल्याने गोलंदाजी त्यांची मुख्य ताकद आहे. त्याशिवाय मुंबईकर यशस्वी जैस्वाल आणि धोकादायक जोस बटलर यांची सलामी जोडी दिल्लीसाठी घातक ठरू शकते. विशेषत: इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवणाऱ्या जैस्वालकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सॅमसन, रियान पराग यांच्याकडून मधल्या फळीत सातत्य अपेक्षित आहे. संदीप शर्मा व आवेश खान या भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये धावा रोखण्याची क्षमता आहे.

दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भूई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स.

राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), अबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल सिंग राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिम्रॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोल्हर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युझवेंद्र चहल, तनुष कोटियन.

logo
marathi.freepressjournal.in