हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे गुजरातसमोर आव्हान

दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलेल्या मोहम्मद शमीची जागा भरून काढण्यात उमेद यादव पूर्णपणे अपयशी ठरला आहे. चेन्नईकडून ६३ धावांनी पराभव पत्करल्यामुळे गुजरातचे नेट रनरेट -१.४२५ इतके खाली आले आहे. याचा फटका त्यांनी साखळी फेरीच्या अखेरीस बसू शकतो.
हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचे गुजरातसमोर आव्हान

अहमदाबाद : सनरायजर्स हैदराबादने गेल्या दोन्ही सामन्यांत दोनशेपेक्षा धावा फटकावल्यामुळे गुजरातच्या गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक विक्रमी धावसंख्या नोंदवली. त्यामुळे रविवारी दुपारी होणाऱ्या या सामन्यात सनरायझर्सच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना उचलावी लागणार आहे.

गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडल्यानंतर गुजरातने पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला. मात्र त्यानंतर चेन्नईविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतलेल्या मोहम्मद शमीची जागा भरून काढण्यात उमेद यादव पूर्णपणे अपयशी ठरला आहे. चेन्नईकडून ६३ धावांनी पराभव पत्करल्यामुळे गुजरातचे नेट रनरेट -१.४२५ इतके खाली आले आहे. याचा फटका त्यांनी साखळी फेरीच्या अखेरीस बसू शकतो.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने गेल्या दोन मोसमात विजेतेपद आणि उपविजेतेपद अशी मजल मारली होती. मात्र आता पंड्या मुंबई इंडियन्सकडे गेल्यानंतर गुजरातला अष्टपैलू क्रिकेटपटूची नितांत उणीव जाणवत आहे. वृद्धिमन साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतियासारखे फलंदाज चांगली कामगिरी करत असले तरी गुजरातच्या फलंदाजीत पूर्वीसारखी लकाकी दिसत नाही.

चेन्नईने विजयासाठी ठेवलेले २०८ धावांचे लक्ष्य गाठताना, गुजरातची भंबेरी उडाली होती. साई सुदर्शनचा (३७) अपवाद वगळता, त्यांच्या एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता. कर्णधार गिल हासुद्धा अपयशी ठरला असून त्याने ३१ आणि ८ धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या फलंदाजीतील फॉर्मविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच डेव्हिड मिलर यालाही १२ आणि २१ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे मिलर फॉर्मात परतावा, अशी अपेक्षा गुजरातचे चाहते व्यक्त करत आहेत.

या स्पर्धेतील ‘डार्क हॉर्स’ म्हणून समजला जाणाऱ्या सनरायझर्सने यंदा मात्र सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. सनरायझर्सने हेन्रिच क्लासेन, अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमधील विक्रमी अशी ३ बाद २७७ धावसंख्या उभारली. त्यांनी यापूर्वी २०१३मधेय पुणे वॉरियर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रचलेला ५ बाद २६३ धावांचा विक्रम मागे टाकला. ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ट्रेव्हिस हेडने सनरायजर्सकडून दमदार पदार्पण केले आहे. त्याने अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक फटकावले. तसेच भारताच्या अभिषेक शर्माने १६ चेंडूंत अर्धशतकाला गवसणी घातली. हेडच्या ६२ धावा आणि अभिषेकच्या ६३ धावांच्या खेळीमुळे सनरायजर्सने दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर आयडेन मार्करम (४२) आणि हेन्रिच क्लासेन यांच्या स्फोटक फलंदाजीमुळे सनरायजर्सला हा विक्रम रचता आला. क्लासेनने ३४ चेंडूंत ४ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी करत नाबाद ८० धावा तडकावल्या. ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिन्स याच्या नेतृत्वाखालील सनरायजर्सचा संघ समतोल वाटत आहे.

प्रतिस्पर्धी संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमन साहा, रॉबिन मिंझ, केन विल्यम्सन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, अझमतुल्ला ओमरझई, शाहरूख खान, जयंत यादव, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, साई किशोर, उमेश यादव, रशिद खान, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा, मानव सुतार.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, आयडेन मार्करम, ट्रेव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, मार्को यान्सेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सानवीर सिंग, हेन्रिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक अगरवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयांक मार्कंडे, उपेंद्र सिंह यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फझलहक फारूकी, शाहबाझ अहमद, जयदेव उनाडकट, आकाश सिंग आणि जठावेध सुब्रह्मण्यम.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in