ब्रिस्बेन : ट्रॅव्हिस हेड (१६० चेंडूंत १५२ धावा) आणि अनुभवी स्टीवन स्मिथ (१९० चेंडूंत १०१ धावा) यांनी शानदार शतके झळकावत यजमान ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले. बॉर्डर - गावस्कर मालिकेतील तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर रविवारी ऑस्ट्रेलियाने धावफलकावर ७ फलंदाज गमावून ४०५ धावा जमवल्या आहेत. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रित बुमराहने विकेटचे पंचक मिळवले. मात्र बुमराह वगळता भारताच्या अन्य गोलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही.
पहिल्या दिवसातील दोन सत्रे पाण्यात गेल्यामुळे शनिवारी केवळ १३.२ षटकांचा खेळ झाला. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रविवारी भारताच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली. सतराव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बुमराहच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजा यष्टीरक्षक ऋषभ पंत करवी झेलबाद झाला. २१ धावांवर ख्वाजाला माघारी परतावे लागले. नॅथन मॅकस्विनीलाही आपल्या सापळ्यात अडकवण्यात बुमराहला यश आले. विराट कोहलीने झेल टिपत ९ धावांवर त्याला परतीची वाट दाखवली. त्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव स्मिथ यांना ही जोडी बरी स्थिरावली होती. इथे नितीश कुमार भारताच्या मदतीला धाऊन आला. त्याने ५५ चेंडूंत १२ धावा करणाऱ्या लाबुशेनला विराट करवी झेलबाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. ७५ धावांवर ३ प्रमुख फलंदाज बाद अशा संकटात ऑस्ट्रेलियाचा संघ सापडला. मात्र त्यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव स्मिथ यांनी शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढले. पहिल्या सत्रात प्रभावी गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी नंतर मात्र निराश केले. हेड आणि स्मिथ या जोडीसमोर भारताते गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करताना दिसले. हेड आणि स्मिथ या दोघांनाही बुमराहनेच तंबूचा रस्ता दाखवला. ५ धावा करणारा मिचेल मार्शही बुमराहच्या सापळ्यात अडकला. मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. दुसऱ्या दिवसाअखेर अॅलेक्स कॅरी (नाबाद ४५ धावा) आणि मिचेल स्टार्क (नाबाद ७ धावा) ही जोडी मैदानात आहे.
भारताच्या जसप्रित बुमराहने शानदार गोलंदाजी केली. त्याने २५ षटके फेकत ७२ धावा देत ५ विकेट मिळवल्या. त्याला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आणि शेवटच्या सत्रात विकेट मिळवण्यात यश आले. त्याने मालिकेत दुसऱ्यांदा ५ विकेट घेण्याची कामगिरी केली. मात्र अन्य गोलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही.
बुमराहच्या विकेटचे पंचक
बॉर्डर - गावस्कर मालिकेत आतापर्यंत जसप्रित बुमराहने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या ताब्यात ठेवले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी त्याने ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याने मालिकेत दुसऱ्यांदा ५ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्विनी, हेड, स्मिथ यांच्यानंतर मिचेल मार्श अशा ५ प्रमुख फलंदाजांना बुमराहने माघारी धाडले.
स्मिथला सूर गवसला
स्मिथची ही क्लासिकल खेळी ठरली. अलिकडच्या डावांत त्याला मोठी खेळी खेळण्यात अपयश आले आहे. त्याने गेल्या २५ डावांमध्ये पहिल्यांदा तीन आकडी धावसंख्या जमवत त्याच्या विरोधकांना शांत केले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे ३३वे शतक ठरले. स्मिथ हा जो रूटसह भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके (१०) करणारा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला आहे. या दोघांनंतर रिकी पाँटिंग, सर व्हिव्हियन रिचर्ड्स आणि सर गारफिल्ड सोबर्स (प्रत्येकी ८) यांनी भारताविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावली आहेत.
भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारे खेळाडू
भारताविरुद्ध हेडची शानदार खेळी
हेडने १६० चेंडूंत १५२ धावा जमवल्या. हेडच्या या शतकी खेळीत १८ चौकारांचा समावेश होता. ११५ चेंडूंत त्याने शतक झळकावले. भारताविरुद्ध हेडच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघत आहेत. हेडने २०२३ मध्ये ओव्हल येथे झालेल्या डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावले होते. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याने शतकी कामगिरी केली होती. तसेच सध्या सुरू असलेल्या मालिकेतही त्याने भारताविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे.
७५ धावांवर ३ फलंदाज बाद अशा अडचणीत ऑस्ट्रेलियाचा संघ सापडला होता. मात्र ट्रॅव्हिस हेड आणि अनुभवी स्टीवन स्मिथ या जोडीने त्यांचा डाव सावरला आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. हेड - स्मिथ या मधल्या फळीतील जोडीने चौथ्या विकेटसाठी २४१ धावांची भागिदारी रचली.