

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज आणि सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे कामाचा ताण (वर्कलोड मॅनेजमेंट) नियंत्रित ठेवण्यासाठी आणि कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी आयपीएल २०२७ मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेडने आगामी हंगामात न खेळण्याचा निर्णय आपल्या फ्रँचायझीला कळवला आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादने त्याला संघातून मुक्त केले आहे. हेडच्या माघारीमुळे आयपीएल २०२७ मध्ये सनरायझर्स हैदराबादची ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही लोकप्रिय सलामीची जोडी मैदानात दिसणार नाही. हेडच्या अनुपस्थितीमुळे हैदराबादच्या फलंदाजीला मोठा धक्का बसू शकतो. मात्र, हेडला मुक्त केल्याने आता SRH कडे १६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी संघाकडे मोठी रक्कम उपलब्ध होऊ शकते.
२०२५ च्या मेगा लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबादने कायम ठेवलेल्या पाच अनुभवी खेळाडूंमध्ये हेडचा समावेश होता. त्यासाठी त्याला १४ कोटी रुपये देण्यात आले होते. सनरायझर्स हैदराबादने २०२४ च्या आयपीएल लिलावात हेडला प्रथम ६.८ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्या हंगामात त्याने ४० पेक्षा अधिक सरासरीने आणि १९१.५५ च्या स्ट्राइक रेटने ५६७ धावा केल्या होत्या. त्याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर हैदराबादने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.
२०२५ च्या आयपीएल हंगामात त्याने ३७४, तर २०२६ च्या हंगामात ४१० धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना हेडने ४३ सामन्यांत ३२.९५ च्या सरासरीने आणि १७६.१४ च्या स्ट्राइक रेटने एकूण १,३५१ धावा केल्या आहेत. अभिषेक शर्मासोबत त्याची सलामीची जोडी कमालीची यशस्वी ठरली. या दोघांनी आयपीएलसह संपूर्ण टी-२० क्रिकेटमध्ये सलामीच्या फलंदाजीची पारंपरिक पद्धत बदलून टाकणारी आक्रमक शैली विकसित केली.
सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) सोशल मीडियावरून हेडचा निरोप संदेश प्रसिद्ध करण्यात आला.
ट्रेव्हिस हेडचा निरोप संदेश
"हा एक अत्यंत कठीण निर्णय होता, पण माझ्या आगामी आंतरराष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आणि कुटुंबाला पुरेसा वेळ देऊन वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याचे योग्य संतुलन (Work-Life Balance) साधण्याची गरज लक्षात घेता, करिअरच्या या टप्प्यावर हाच निर्णय योग्य असल्याचे मला वाटते", असे हेडने म्हटले.
पुढे, "सनरायझर्स हैदराबादसोबतच्या तीन अविश्वसनीय वर्षांनंतर, या प्रवासाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे मी मनापासून आभार मानू इच्छितो. माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि पाठिंब्याबद्दल मी संघाचे मालक व व्यवस्थापनाचे खूप आभार मानतो. तसेच, चांगली मैत्री आणि सुंदर आठवणी दिल्याबद्दल प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि सर्व खेळाडूंचेही मनःपूर्वक आभार. ऑरेंज आर्मी'च्या (हैदराबादच्या चाहत्यांच्या) अफाट प्रेमाबद्दल आणि अखंड पाठिंब्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आपण एकत्र मिळवलेल्या यशाचा मला खूप अभिमान आहे. मी सनरायझर्स हैदराबादसोबत घालवलेल्या काळाकडे नेहमीच सुंदर आठवणी आणि आदराने पाहीन. सनरायझर्स हैदराबादमधील प्रत्येकाला भविष्यातील यशासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद, हैदराबाद!" असे त्याने अखेरीस लिहिले. सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) सोशल मीडियावरून हेडचा निरोपसंदेश पोस्ट करण्यात आला आहे.
अभिषेक शर्मासाठी खास पोस्ट
याव्यतिरिक्त, हेडने आपला सलामीचा जोडीदार अभिषेक शर्मा याच्यासोबतचे तीन फोटो शेअर करत लिहिले की, "या रॉकस्टारसोबत मैदानात फलंदाजीला उतरणे मी खूप मिस करेन, धन्यवाद". यावर अभिषेकनेही ""सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद हेडी" अशा शब्दांत त्याला निरोप दिला.