Ranji Trophy : देशपांडेमुळे मुंबईचे पुन्हा वर्चस्व; हिमाचल प्रदेशला १४० धावांत गुंडाळण्यात यश; दिवसअखेर २ बाद १०७

वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने (४६ धावांत ४ बळी) सलग दुसऱ्या लढतीत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ड-गटातील साखळी सामन्यात यजमान हिमाचल प्रदेशचा पहिला डाव ३९.५ षटकांत १४० धावांत गुंडाळला.
Ranji Trophy : देशपांडेमुळे मुंबईचे पुन्हा वर्चस्व; हिमाचल प्रदेशला १४० धावांत गुंडाळण्यात यश; दिवसअखेर २ बाद १०७
Ranji Trophy : देशपांडेमुळे मुंबईचे पुन्हा वर्चस्व; हिमाचल प्रदेशला १४० धावांत गुंडाळण्यात यश; दिवसअखेर २ बाद १०७X
Published on: 

बिलासपूर : वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने (४६ धावांत ४ बळी) सलग दुसऱ्या लढतीत चमकदार कामगिरी केली. त्यामुळे मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ड-गटातील साखळी सामन्यात यजमान हिमाचल प्रदेशचा पहिला डाव ३९.५ षटकांत १४० धावांत गुंडाळला. पहिल्याच दिवशी मुंबईने पकड मिळवत आघाडीच्या दिशेने वाटचाल केली आहे.

बिलासपूर येथील लुहनू मैदानावर सुरू असलेल्या या लढतीत पहिल्या दिवसअखेर मुंबईने ३६ षटकांत २ बाद १०७ धावा केल्या आहेत. मुंबईचा संघ फक्त ३३ धावांनी पिछाडीवर असून कर्णधार सिद्धेश लाड ३२, तर मुशीर खान ३४ धावांवर नाबाद आहे. दिव्यांश सक्सेना (९) व अंक्रिश रघुवंशी (२०) यांची सलामीची जोडी तंबूत परतली आहे. दुसऱ्या दिवशी मुंबईकडे मोठी आघाडी घेण्याची संधी आहे.

दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या रणजी स्पर्धेच्या ९२व्या हंगामाला रविवार, ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. प्रामुख्याने भारताच्या कसोटी संघातील स्थान टिकवण्यासह पुनरागमन करण्यास आतुर असलेल्या तारांकित खेळाडूंच्या कामगिरीकडे या स्पर्धेत विशेष लक्ष असेल. एलिट गटातील ३२ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल. बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वीच जाहीर केलेल्या आदेशानुसार यंदाही वरिष्ठ खेळाडूंना शक्य असेल तेव्हा देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होणे अनिवार्य असेल.

गतवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा रणजी स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवण्यात येईल. या स्पर्धेचा पहिला टप्पा ११ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल. या काळात प्रत्येक संघ चार सामने खेळेल. मग दरम्यानच्या काळात विजय हजारे एकदिवसीय स्पर्धा व सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा रंगेल. त्यानंतर २०२७ मध्ये १७ जानेवारीपासून रणजीचा दुसरा टप्पा सुरू होईल. ९ फेब्रुवारीपासून उपांत्यपूर्व फेरी, १८ फेब्रुवारीपासून उपांत्य फेरी, तर २७ फेब्रुवारीपासून महाअंतिम सामना रंगेल.

सिद्धेशच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने पहिल्या साखळी सामन्यात वानखेडेवर चंदीगडचा तीन दिवसांतच डावाच्या फरकाने फडशा पाडला. मात्र आयुष म्हात्रेला झालेली दुखापत व भारत-अ संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेला यशस्वी जैस्वाल या दोघांच्या अनुपस्थितीत मुंबईची कसोटी लागणार होती. ३१ वर्षीय देशपांडेने पहिल्या लढतीप्रमाणेच गोलंदाजीत सूत्रे हाती घेतली. त्याने गोलंदाजांना पोषक खेळपट्टीचा लाभ उचलून शिस्तबद्ध मारा केला व हिमाचलच्या फलंदाजांना अडचणीत आणले.

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर देशपांडेने सलामीवीर शुभम अरोराला पायचीत टिपले. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये नेहल वढेराला ८ धावांवर बाद करून हिमाचलची स्थिती ६ षटकांत ३ बाद २२ अशी केली. दुसरा सलामीवीर इनिश महाजन ११ धावा काढून मोहिम अवस्थीच्या गोलंदाजीवर बाद झाला. हिमाचलचा कर्णधार पुखराज मॅन (३५), यष्टीरक्षक वैभव कलिता (३३) आणि आकाश वशिष्ठ (३९) यांनी काही वेळ संघर्ष केला, परंतु त्यांच्या या योगदानानंतरही यजमानांना स्पर्धात्मक धावसंख्या गाठता आली नाही.

देशपांडे आणि सहकारी वेगवान गोलंदाज सिल्वेस्टर डिसोझा (४३ धावांत दोन बळी) यांनी सातत्याने धक्के देत हिमाचलचा डाव लवकर आटोपला. मोहित व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. आपल्या कारकीर्दीतील ५१वा प्रथम श्रेणी सामना खेळणारा देशपांडे या प्रकारात दीडशे बळींच्या मैलाचा दगड गाठण्याच्या जवळ पोहोचला आहे.

तुषारचे यंदाच्या रणजी हंगामात आतापर्यंत ११ बळी झाले आहेत. त्याने चंदीगडविरुद्ध सात (पहिल्या डावात ५, दुसऱ्या डावात २) गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश (पहिला डाव) : ३९.५ षटकांत सर्व बाद १४० (आकाश वशिष्ठ ३९; तुषार देशपांडे ४/४६)

मुंबई (पहिला डाव) : ३६ षटकांत २ बाद १०७ (मुशीर खान नाबाद ३४, सिद्धेश लाड नाबाद ३२; अभिषेक कुमार १/१९)

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in