रणजी ट्रॉफी मॅचमध्ये गोंधळ; मुंबईविरूद्ध सामन्यासाठी आले बिहारचे दोन संघ; पोलिसांनी जबरदस्तीने बसमधून....

रणजी ट्रॉफी 2023-24 चा पहिला दिवस वेगळ्याच कारणासाठी गाजला. मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी बिहारचे एक नव्हे तर चक्क दोन संघ मैदानात उतरले.
रणजी ट्रॉफी मॅचमध्ये गोंधळ; मुंबईविरूद्ध सामन्यासाठी आले बिहारचे दोन संघ; पोलिसांनी जबरदस्तीने बसमधून....

रणजी ट्रॉफी 2023-24 चा पहिला दिवस (शुक्रवार) वेगळ्याच कारणासाठी गाजला. बिहारच्या पाटणा येथील मोईन-उल-हक स्टेडियमवर मुंबई विरुद्ध बिहार हा पहिला सामना होता. पण, या सामन्यासाठी बिहारचे एक नव्हे तर चक्क दोन संघ मैदानात उतरले. या सामन्याद्वारे तब्बल १८ वर्षांनंतर बिहारचा संघ रणजी ट्रॉफीमध्ये परतला. मात्र, या पुनरागमनाआधीच मोठा वाद निर्माण झाला आणि बिहार क्रिकेट संघटनेचे (बीसीए) संपूर्ण देशासमोर हसू झाले.

पोलिसांनी बसमध्ये बसवून स्टेडियमबाहेर काढले-

बीसीएतील दोन गटांमधील 'लढाई' मैदानात बघायला मिळाली. सुरूवातीला अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी आणि किरकोळ बाचाबाची झाली. प्रकरण इतके वाढले की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, पोलिस आल्याने प्रकरण वेळीच आटोक्यात आले आणि दुपारी उशीरा एकच्या सुमारास बिहार-मुंबई सामना अखेर सुरू झाला. सकाळीच मैदानावर पोहोचलेल्या दोन संघांपैकी एक संघ बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी निवडला होता, तर दुसरा संघ सचिव अमित कुमार यांचा होता. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही संघात एकही क्रिकेटपटू असा नव्हता ज्याचे नाव दोन्ही संघांमध्ये होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर सचिव अमित कुमार यांनी निवडलेल्या संघाला बळजबरी बसमध्ये बसवून स्टेडियमबाहेर काढावे लागले. त्यानंतर तिवारींच्या संघाला खेळण्याची परवानगी मिळाली.

'त्यांच्या मुलाची संघात निवड झाली नाही म्हणून...'

बीसीएचे अध्यक्ष राकेश तिवारी म्हणाले, 'आम्ही गुणवत्तेच्या आधारावर संघ निवडला असून तो योग्य संघ आहे. बिहारमधून आलेले टॅलेंट तुम्हाला दिसते. आमच्याकडे एक क्रिकेटपटू (साकिब हुसेन) आहे ज्याची आयपीएलमध्ये निवड झाली आहे. आमच्याकडे 12 वर्षांचा एक विलक्षण खेळाडू आहे जो पदार्पण करीत आहे. दुसरा संघ त्या सचिवाने निवडला आहे, ज्याचे स्वतःचे निलंबन झाले आहे. त्यामुळे तो खरा संघ असूच शकत नाही असे ते म्हणाले. दुसरीकडे, सचिव अमित यांनी तिवारी यांच्या निलंबनाच्या दाव्याला आव्हान दिले. "सर्वात पहिली गोष्ट- मी निवडणूक जिंकलोय आणि मी बीसीएचा अधिकृत सचिव आहे. तुम्ही सचिवाला निलंबित करू शकत नाही. दुसरे म्हणजे, अध्यक्ष संघाची निवड कशी करू शकतो? बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना संघाची घोषणा करताना तुम्ही कधी पाहिले आहे का? तुम्हाला नेहमी सचिव जय शाह यांचीच स्वाक्षरी दिसेल,” असे ते म्हणाले. दिवसाच्या शेवटी, बीसीएने एका प्रसिद्धीपत्रकात निलंबित सचिव अमितवर बनावट टीमसह येऊन गेटवर एका अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा ठपका ठेवला. 'बीसीए ओएसडी मनोज कुमार यांच्यावर बनावट टीममध्ये सामील असलेल्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल', असे बीसीएने प्रसिद्धीपत्रकात म्हटले. तर, बीसीए अध्यक्ष तिवारी यांनी 2013 च्या स्पॉट-फिक्सिंग प्रकरणातील मूळ याचिकाकर्ता आदित्य वर्माला स्टेडियममधील गोंधळासाठी जबाबदार धरले. बिहारची प्रतिमा खराब करणे हे त्यांचे एकमेव काम आहे. मुलाची निवड न झाल्याने तो उपद्रव निर्माण करत आहे. तो आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्ही गुणवत्तेनुसार संघ निवडतो म्हणून आम्ही त्याचे कधीही ऐकले नाही,” असे तिवारी म्हणाले. मात्र, सचिव अमित यांनी या दाव्याला विरोध केला. “तो आदित्य वर्माला दोष देत आहे, पण जेव्हा तो त्यांच्या बाजूने होता तेव्हा शांत का होते? बीसीए ही एकमेव संघटना आहे जिथे सचिवांना काहीच अधिकार नाही,” असे अमितने म्हटले. तर, वर्मा यांनी हे अध्यक्ष आणि सचिव यांच्यातील भांडण असल्याचे म्हटले. “हे दोघांमधील भांडण आहे. माझ्या मुलाने चाचण्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. जर माझ्या मुलाला एका टीममध्ये निवडले असेल तर तो माझा दोष आहे का? ते (तिवारी) माझ्या मागे लागले आहेत कारण मी त्यांच्या भ्रष्टाचारावर प्रश्न विचारत आहे”, असे सांगितले.

तथापि, दिवसाच्या खराब सुरुवातीचा परिणाम बिहारच्या संघावर झाला नाही. नाणेफेक जिंकून बिहारने बलाढ्य मुंबईला 235/9 या धावसंख्येवर रोखले. बिहारसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज वीर प्रताप सिंग याने सर्वोत्तम कामगिरी ( 4/32) केली.

logo
marathi.freepressjournal.in