उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत दोन महिला खेळाडू दोषी आढळल्या

दोन्ही खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यास अपात्र ठरल्याने त्यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही
 उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत दोन महिला खेळाडू  दोषी आढळल्या

येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत असतानाच पदकांच्या प्रबळ दावेदार असलेल्या दोन महिला खेळाडू उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत (डोपिंग टेस्ट) दोषी आढळल्या आहेत. दोन्ही खेळाडू स्पर्धेत सहभागी होण्यास अपात्र ठरल्याने त्यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय चमूचा भाग असलेली धावपटू एस. धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीमध्ये राष्ट्रीय विक्रम नावावर असलेली ऐश्वर्या बाबू उत्तेजक द्रव्यसेवन चाचणीत दोषी आढळल्या आहेत. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या ‘अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट’ने (एआययू) घेतलेल्या चाचणीत धनलक्ष्मीने प्रतिबंधित स्टेरॉइड्स सेवन केल्याचे निदर्शनास आले.

धनलक्ष्मी १०० मीटर आणि ४ बाय १०० मीटरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होती. युजीन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठीदेखील ती भारतीय संघाचा भाग होती; पण व्हिसाच्या समस्येमुळे ती जाऊ शकली नव्हती. धनलक्ष्मीने २६ जून रोजी ‘कोसानोव्ह मेमोरियल अ‍ॅथलेटिक्स मीट’मध्ये २०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकाविले होते.

गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपदरम्यान राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेच्या (नाडा) अधिकाऱ्यांनी ऐश्वर्या बाबूचे नमुने घेतले होते. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ऐश्वर्याने चेन्नईमधील स्पर्धेत तिहेरी उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला होता. तिने ६.७३ मीटर लांब उडी मारली होती. एखाद्या भारतीय खेळाडूने केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. याआधी, अंजू बॉबी जॉर्जने ६.८३ मीटर लांब उडी मारली होती. राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास चार हजार ५०० खेळाडू खेळताना दिसणार आहेत. भारतातूनही सुमारे २३० खेळाडूंचा सहभाग असलेला चमू बर्मिंगहॅमला जाणार आहे; मात्र त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in