मुंबई : प्रो कबड्डी लीगच्या १०व्या पर्वातील दमदार कामगिरी कायम राखण्याच्या निर्धाराने यू मुंबा संघ घरच्या मैदानावर खेळणार आहे. तब्बल ४ वर्षानंतर यू मुंबा शुक्रवारी प्रथमच आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. मुंबई-लेगमध्ये एकूण ११ सामन्यांपैकी यू मुंबा एनएससीआय वरळी येथे चार सामने खेळणार असून शुक्रवारी त्यांच्यापुढे बंगळुरू बुल्सचे आव्हान असेल.
यू मुंबाने यंदाच्या पर्वात आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ५ मध्ये विजय मिळवला आहे. यात सलग ४ विजयांचा समावेश आहे आणि हा सकारात्मक खेळ कायम राखून त्यांचा प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न असणार आहे. कर्णधार सुरिंदर सिंग, रिंकू, पदार्पणवीर सोमबीर आणि उपकर्णधार महेंदर सिंग यांनी यू मुंबाची बचावफळी भक्कम करताना भल्याभल्या प्रतिस्पर्धींना इंगा दाखवला आहे. त्यात संघात नव्याने दाखल झालेला इराणचा १९ वर्षीय आमिरमोहम्मद जफरदानेश यानेही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. तो आतापर्यंत संघासाठी सर्वाधिक ६४ गुणांची कमाई करून सर्वोत्तम चढाईपटू ठरला ठरला. चढाईपटू गुमान सिंग आणि प्रमुख अष्टपैलू विश्वंथ यांच्या कामगिरीचा देखील यू मुंबाच्या यशात मोठा वाटा आहे.
मुंबईत गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमासाठी यू मुंबाचे सीईओ सुहेल चंधोक, तसेच प्रशिक्षक घोलाम्रेझा मजंदारानी, कर्णधार सुरिंदर, महेंदर आणि गुमान हे कबड्डीपटू उपस्थित होते.
“घरच्या चाहत्यांसमोर संघाला त्यांचा अव्वल खेळ देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. माझ्यासाठी घरातील किंवा बाहेरचा प्रत्येक सामना तितकाच महत्त्वाचा आहे, परंतु मुंबई लेग दरम्यान चाहत्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही घरच्या मैदानाचा फायदा करून घेण्याची आम्हाला आशा आहे. आम्ही खेळलेल्या सात सामन्यांचे विश्लेषण केल्यास, आम्हाला तारेवरची कसरत करावी लागली, परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये दबावाखाली रणनीतीच्या बाबतीत कमालीची सुधारणा झाली आहे,” असे प्रशिक्षक मजंदारानी म्हणाले.
तिकिटांसाठी चाहत्यांनी काय करावे?
ज्या चाहत्यांना प्रो कबड्डीचे सामने पाहण्याची इच्छा आहे त्यांनी पेटीएम इनसायडर ॲपला भेट द्यावी. येथे ३०० रुपयांपासून तिकिटांची सुरुवात असून सहाही दिवसांच्या सामन्याची तिकिटे उपलब्ध आहेत. यापूर्वी २०१९मध्ये मुंबईत प्रो कबड्डीचे सामने झाले होते. त्यानंतर कोरोनामुळे यामध्ये खंड पडला. यंदा ४ वर्षांनी पुन्हा ‘होम आणि अवे’ लेगला प्रारभ झाल्याने मुंबईतील चाहत्यांना प्रो-कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे.
धारावीच्या बँडकडून मुंबईसाठी खास गाणे
प्रो कबड्डीत यू मुंबाची १० वर्षे साजरी करण्यासाठी मुंबईच्या डायनॅमिक हिप-हॉप क्रू ‘सेव्हन बंटायज’ यांनी शहराचे सार टिपणारे गीत रचले आहे. धारावीतील हा बँड ५ व ६ जानेवारीला सामन्याला सुरुवात होण्याअगोदर त्यांचे गीत सादर करणार आहे.