युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय युवा संघाची अंतिम फेरीत धडक; लक्ष्य, सेहवाग यांच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानवर वर्चस्व

कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या शानदार ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा आठ गडी आणि ७९ चेंडू राखून पराभव केला.
युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय युवा संघाची अंतिम फेरीत धडक; लक्ष्य, सेहवाग यांच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानवर वर्चस्व
युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय युवा संघाची अंतिम फेरीत धडक; लक्ष्य, सेहवाग यांच्या अर्धशतकांमुळे अफगाणिस्तानवर वर्चस्वPhoto -X
Published on: 

अल अमेरात (ओमान) : कर्णधार लक्ष्य रायचंदानीच्या शानदार ९३ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने १९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा आठ गडी आणि ७९ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली असून, आता विजेतेपदासाठी भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. हा अंतिम सामना शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणार आहे.

अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ८ बाद २२७ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी करत अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. वेगवान गोलंदाज इशान सूडने ४३ धावांत तीन बळी घेतले. मधल्या षटकांमध्ये भारतीय फिरकीपटूंनीही अफगाणिस्तानच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. अफगाणिस्तानकडून नोमान सलारझाई आणि शाह फैसल रहिमी यांनी प्रत्येकी ५१ धावा केल्या.

२२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार लक्ष्य रायचंदानीने ९० चेंडूंत १३ चौकार आणि एका षटकारासह ९३ धावांची खेळी केली. त्याला सलामीवीर आर्यवीर सेहवागने ५१ धावांची शानदार साथ दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १७ षटकांत ११७ धावांची भागीदारी केली. सेहवागने ५६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना तीन षटकार ठोकले. मात्र, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला.

त्यानंतर रायचंदानीने व्ही. के. विनीतसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७७ धावांची भागीदारी केली. विनीतने नाबाद ५७ धावा केल्या. त्याने ६१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अखेर नूर अलीच्या गोलंदाजीवर सलग चौकार आणि षटकार ठोकत विनीतने भारताला ३६.५ षटकांत २३० धावांपर्यंत पोहोचवले. भारताने दोन विकेट्स गमावून सामना जिंकला.

दरम्यान, आता भारतासमोर शनिवारी जेतेपदासाठी पाकिस्तानचे आव्हान असेल. साखळी फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारतावर ३ गडी व ११ चेंडू राखून विजय मिळवला होता. हमजा जहूरने (१०८ चेंडूंत नाबाद १०० धावा) शतकी खेळी करत भारताच्या अर्जुन राजपूतच्या आक्रमक १०७ धावांच्या खेळीवर पाणी फेरले.

रविवारी झालेल्या अ-गटातील या सामन्यात पाकिस्तानने भारताचे २०९ धावांचे लक्ष्य दोन षटके शिल्लक असताना पूर्ण केले. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हमजा जहूरने हसनैन डारसोबत १०७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दारने ३८ धावांचे योगदान दिले. पाकिस्तान एकवेळ ५ बाद ६१ अशा संकटात होता. मात्र तरीही त्यांनी विजय मिळवून दाखवला.

त्यामुळे आता भारतीय संघ त्या पराभवाचा वचपा काढून जेतेपद मिळवणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पाकिस्तानही अंतिम फेरीत

दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा नऊ विकेट्सनी पराभव केला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज रिझवानुल्लाहने ३० धावांत पाच बळी घेत बांगलादेशचा डाव १३८ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात उस्मान खानने नाबाद ६४, तर हयाम खानने ६९ धावा केल्या. पाकिस्तानने २१.५ षटकांतच विजय मिळवला. विशेष म्हणजे, साखळी सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारतीय संघाला त्या पराभवाचा वचपा काढण्याची आणि आशिया चषक जिंकण्याची संधी असेल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)