Euro 2024: स्पेनकडून फ्रान्सला पेन! अंतिम फेरीत थाटात धडक; यमाल, ओल्मोच्या गोलमुळे उपांत्य लढतीत २-१ असा विजय

UEFA Euro 2024: १६ वर्षीय लॅमिन यमाल आणि डॅनी ओल्मो यांनी केलेल्या नेत्रदीपक गोलच्या बळावर स्पेनने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य फ्रान्सला पराभवाचा पेन केला. उपांत्य लढतीत फ्रान्सचा २-१ असा पराभव करून त्यांनी पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
 Twitter
Twitter
Published on

Spain vs France, Euro 2024 Semifinals:  म्युनिक : १६ वर्षीय लॅमिन यमाल आणि डॅनी ओल्मो यांनी केलेल्या नेत्रदीपक गोलच्या बळावर स्पेनने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य फ्रान्सला पराभवाचा पेन केला. उपांत्य लढतीत फ्रान्सचा २-१ असा पराभव करून त्यांनी पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.

अलिन्झ एरिना येथे झालेल्या या लढतीत २०१८चा फि‌फा विश्वचषक विजेता फ्रान्स आणि २००८ व २०१२च्या युरो चषक विजेत्या स्पेनमध्ये चाहत्यांना कमालीची झुंज पाहायला मिळाली. फ्रान्ससाठी कोलो मुलानीने नवव्याच मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या स्पेनच्या आक्रमणापासून ते अधिक काळ वाचू शकले नाहीत. २१व्या मिनिटाला यमालने डाव्या पायाद्वारे तब्बल २५ मीटर अंतरावरून अफलातून गोल झळकावला. हा गोल पाहून फ्रान्सचा किलियान एम्बाप्पेसुद्धा अवाक झाला.

त्यानंतर लगेगच चार मिनिटांनी २६ वर्षीय ओल्मोने दुसरा गोल नोंदवत स्पेनची आघाडी २-१ अशी वाढवली. यानंतर उर्वरित सामन्यात एम्बाप्पे, डेम्बेले, ओलिव्हर जिरूड यांनी बरोबरी साधण्यासाठी अथक परिश्रम केले. मात्र त्यांना स्पेनचा बचाव भेदता आला नाही. त्यामुळे स्पेनने २०१२नंतर प्रथमच युरो चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता रविवारी मध्यरात्री होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यासमोर इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

  • स्पेनचा यमाल हा कोणत्याही आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत (युरो अथवा फिफा) गोल करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. यमालचे वय १६ वर्षे आणि ३६२ दिवस आहे. त्याने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचा विक्रम मोडीत काढला. पेले यांनी १९५८च्या फिफा विश्वचषकात वेल्सविरुद्ध वयाच्या १७व्या वर्षी गोल नोंदवला होता.

  • स्पेनने पाचव्यांदा युरो चषकाची अंतिम फेरी गाठली. यापूर्वी १९६४, २००८, २०१२मध्ये त्यांनी जेतेपद मिळवले. तर १९८४मध्ये त्यांना अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता.

  • स्पेनने या स्पर्धेत सलग सहा सामने जिंकताना सर्वाधिक १३ गोल केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in