भारतीय क्रीडा चाहत्यांना अल्टिमेट खो-खो लीगचे वेध; स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, गुजरातसह ओडिशा जगरनॉट्स, चेन्नई क्वीक गन्स, तेलुगू योद्धाज आणि राजस्थान वॉरियर्स हे सहा संघ पहिल्या हंगामात सहभागी होणार
भारतीय क्रीडा चाहत्यांना अल्टिमेट खो-खो लीगचे वेध; स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर
Published on

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा थरार अनुभवल्यानंतर आता भारतीय क्रीडा चाहत्यांना अल्टिमेट खो-खो लीगचे वेध लागले आहेत. बालेवाडी, पुणे येथे रविवार, १४ ऑगस्टपासून अल्टिमेट लीगच्या पहिल्या पर्वाला प्रारंभ होणार असून सलामीच्या लढतीत मुंबई खिलाडीज आणि गुजरात जायंट्स हे संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत.

२०१९मध्ये सर्वप्रथम अल्टिमेट खो-खो लीगची संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली. त्यानंतर जवळपास तीन वर्षांनी या लीगच्या आयोजनाला मुहूर्त मिळाला असून मुंबई, गुजरातसह ओडिशा जगरनॉट्स, चेन्नई क्वीक गन्स, तेलुगू योद्धाज आणि राजस्थान वॉरियर्स हे सहा संघ पहिल्या हंगामात सहभागी होणार आहेत. मुंबईचे नेतृत्व इचलकरंजीच्या विजय हजारेकडे सोपवण्यात आले असून राजेंद्र साप्ते मुंबईचे मुख्य प्रशिक्षक आहेत. या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे सोनी क्रीडा वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून सायंकाळी ७ वाजता सामन्यांना प्रारंभ होणार आहे. २१ दिवसांत एकूण ३४ सामने खेळले जाणार असून मराठी, इंग्रजी, हिंदी आणि तेलुगू भाषेतील समालोचनासह चाहत्यांना सामन्यांचा आस्वाद लुटता येणार आहे.

नव्या नियमांकडे लक्ष

अल्टिमेट लीगमध्ये मूळ खो-खोच्या नियमांत बदल करून नवे नियम अमलात आणले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी खो-खोपटू तसेच संघटकांनी या लीगला विरोध दर्शवला होता. ३६ मिनिटांऐवजी २८ मिनिटांत (सात मिनिटांचे चार डाव) सामना संपवण्यासह वजिराची संकल्पना लीगमध्ये दिसेल. त्याशिवाय खेळाडूला हवेत सूर मारून बाद केल्यास तसेच पोलच्या येथे संरक्षकाला बाद केल्यास बोनस गुण देण्यात येणार आहे

हे आहेत महाराष्ट्राचे शिलेदार

1.मुंबई खिलाडीज : मिलिंद कुरपे, गजानन शेंगाळ, दुर्वेश साळुंखे,

राहुल सावंत, रोहन कोरे, श्रीजेश एस., विजय हजारे, फैजलखान पठाण.

2.चेन्नई क्विक गन्स : महेश शिंदे, अमित पाटील, मनोज पाटील,

राजवर्धन पाटील, प्रीतम चौगुले, रामजी कश्यप.

3.तेलुगू योद्धा : प्रतीक वाईकर, अरुण गुणकी, दीपक माधव, प्रसाद राड्ये, अवधूत पाटील, रोहन शिंगाडे, आदर्श मोहिते.

4.गुजरात जायंट्स : रंजन शेट्टी, अभिनंदन पाटील, निलेश पाटील,

सुयश गरगटे, अक्षय भांगरे, सागर लेंगारे, धीरज भावे, अनिकेत पोटे,

सागर पोतदार, शुभम जांगळे, प्रफुल भनगे.

5.ओडिशा जगरनॉट्स : दिलीप खांडवी, आदित्य कुदळे, सूरज लांडे,

दीपेश मोरे, मिलिंद चावरेकर, निलेश जाधव.

6.राजस्थान वॉरियर्स : अभिजीत पाटील, सुशांत हजारे, सौरभ आडवकर, शैलेश संकपाळ, दिलराजसिंग सेंगनर, अक्षय गणपुले, अजहर जमादार, ऋषिकेश मुर्चावडे, सुरेश सावंत.

मुंबई खिलाडीजचे सामने

दिनांक संघ

१४ ऑगस्ट गुजरात जायंट्स

१५ ऑगस्ट राजस्थान वॉरियर्स

१७ ऑगस्ट गुजरात जायंट्स

१९ ऑगस्ट चेन्नई क्वीक गन्स

२३ ऑगस्ट तेलुगू योद्धाज

२४ ऑगस्ट राजस्थान वॉरियर्स

२६ ऑगस्ट तेलुगू योद्धाज

२७ ऑगस्ट ओडिशा जगरनॉट्स

२९ ऑगस्ट चेन्नई क्वीक गन्स

३० ऑगस्ट ओडिशा जगरनॉट्स

logo
marathi.freepressjournal.in