अल्टिमेट खो-खो लीग: गुजरात जायंट्स अल्टिमेट खो-खोचे किंग!

अंतिम लढतीत मध्यंतरालाच गुजरातने १९-७ अशी आघाडी मिळवली होती. मात्र चेन्नईचा संघ साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत अग्रस्थानी होता.
अल्टिमेट खो-खो लीग: गुजरात जायंट्स अल्टिमेट खो-खोचे किंग!

भुवनेश्वर : गतवर्षी उपांत्य फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाच्या आठवणी मागे सारून यावेळी अखेरीस गुजरात जायंट्सने तेच खो-खोचे ‘अल्टिमेट किंग’ असल्याचे दाखवून दिले. अल्टिमेट खो-खो लीगच्या दुसऱ्या हंगामातील अंतिम फेरीत मुंबईकर अक्षय भांगरेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरातने कोल्हापूरच्या अमित पाटीलच्या कर्णधारपदाखालील चेन्नई क्विक गन्सवर ३१-२६ असे ५ गुणांच्या फरकाने वर्चस्व गाजवून जेतेपदाचा चषक उंचावला.

भुवनेश्वर येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत विजेत्या गुजरातच्या संघाला १ कोटींच्या पारितोषिकासह चषक देऊन गौरवण्यात आले, तर उपविजेत्या चेन्नईला ५० लाख रुपये देण्यात आले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात गतविजेत्या ओदिशा जगरनॉट्सने तेलुगू योद्धाजला ३२-२४ असा सहज पराभूत केले. चेन्नईचा रामजी कश्यप स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. संजीव शर्मा यांनी गुजरातचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले, तर महाराष्ट्राचे महेश पालांडे या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते.

अंतिम लढतीत मध्यंतरालाच गुजरातने १९-७ अशी आघाडी मिळवली होती. मात्र चेन्नईचा संघ साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेत अग्रस्थानी होता. त्यामुळे त्यांच्याकडून पुनरागमनाची अपेक्षा होती. तिसऱ्या टर्ननंतर गुजरात २९-१९ असा आघाडीवर होता. त्यामुळे अखेरच्या टर्नमध्ये चेन्नईला गुजरातचे ११ गडी टिपण्यासह त्यांना ड्रीम रन करण्यापासूनही रोखण्याचे आव्हान होते. गुजरातची पहिली तुकडी १.१५ मिनिटांत, तर दुसरी तुकडी ३.१५ मिनिटांत माघारी परतली. मात्र तिसऱ्या तुकडीतील संकेत कदमने अखेरपर्यंत नाबाद राहत ड्रीम रनचे दोन गुण गुजरातला मिळवून दिले आणि याद्वारेच त्यांचा विजय पक्का झाला.

या सामन्यात चेन्नईकडून रामजी (नाबाद १.५० मिनिटे संरक्षण व आक्रमणात ४ गडी), लक्ष्मण गवस (२.५४ मि., २ गडी) यांनी दमदार खेळ केला. मात्र गुजरातचा सुयश गरगटे (आक्रमणात ४ गडी), दीपक माधव (२.५४ मि.), संकेत (नाबाद १.४२ मि. आणि ६ गडी) यांच्यापुढे चेन्नईचा प्रतिकार कमी पडला. सुयश अंतिम लढतीतील सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर संकेत व विजय शिंदे यांना अनुक्रमे सर्वोत्तम आक्रमक व संरक्षकच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in