भारताच्या पोरी आशियात भारी! बांगलादेशला नमवून १९ वर्षांखालील आशिया चषकाला गवसणी; त्रिशा सामनावीर

निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवतींच्या संघाने आशियात भारताच्या पोरीच भारी असल्याचे दाखवून दिले. १९ वर्षांखालील महिलांच्या पहिल्यावहिल्या टी-२० आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय युवतींच्या संघाने बांगलादेशला ४१ धावांनी धूळ चारून जेतेपद काबिज केले.
भारताच्या पोरी आशियात भारी! बांगलादेशला नमवून १९ वर्षांखालील आशिया चषकाला गवसणी; त्रिशा सामनावीर
Published on

क्वालालम्पूर : निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवतींच्या संघाने आशियात भारताच्या पोरीच भारी असल्याचे दाखवून दिले. १९ वर्षांखालील महिलांच्या पहिल्यावहिल्या टी-२० आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय युवतींच्या संघाने बांगलादेशला ४१ धावांनी धूळ चारून जेतेपद काबिज केले. सलामीवीर त्रिशा घोंगडी आणि डावखुऱ्या फिरकीपटूंचे त्रिकुट यांनी भारताच्या ‌विजयात मोलाची भूमिका बजावली.

ब्यूमस ओव्हल स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दिलेल्या ११८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १८.३ षटकांत ७६ धावांत गारद झाला. डावखुऱ्या आयुषी शुक्लाने ३, तर पारुनिका सिसोडीया, सोनम यादव या फिरकीपटूंनी प्रत्येकी २ बळी मिळवले. सलामीला येत ४७ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारणारी त्रिशा सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. तसेच स्पर्धेत सर्वाधिक १५९ धावा केल्यामुळे त्रिशालाच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. आयुषीने स्पर्धेत सर्वाधिक १० बळी मिळवले.

मलेशिया येथे गेला आठवडाभर आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आगामी टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने आशियातील संघांसाठी उपयुक्त ठरणार आहे. १८ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान मलेशियातच १९ वर्षांखालील महिलांचा टी-२० विश्वचषक रंगणार आहे. २०२३मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात शफाली वर्माच्या नेतृत्वात भारताने जगज्जेतेपद काबिज केले होते. त्यामुळे आता आशिया चषकाच्या जेतेपदासह भारतीय महिलांचा आत्मविश्वास आणखी बळावला असेल.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद ११७ धावांपर्यंत मजल मारली. मध्यमगती गोलंदाज फर्झाना इस्मिनने प्रभावी गोलंदाजी करताना भारताची ६ षटकांत २ बाद २५ अशी स्थिती केली. कामलिनी (५), सानिका चाळके (०) यांनी निराशा केल्यावर त्रिशा व कर्णधार निकी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचली. निकी (१२) बाद झाल्यावर त्रिशाने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक साकारताना ५ चौकार व २ षटकार लगावले. मात्र १६व्या षटकात त्रिशा बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. मिथिला विनोद (१७), आयुषी (१०) यांनी अखेरच्या षटकांत बहुमूल्य योगदान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आयुषी, पारुनिका आणि सोनम यांच्या फिरकीपुढे बांगलादेशचा संघ ढेपाळला. २ बाद ४४ वरून त्यांनी पुढील ३२ धावांत ८ फलंदाज गमावले. जुरिया फर्डोस (२२), फोहमिडा चोया (१८) यांना वगळता कोणीही दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. अखेर १९व्या षटकात आयुषीने अनिसाला बाद करून बांगलादेशचा संघ ७६ धावांत गुंडाळला आणि भारताच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. आता जानेवारीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकातही भारतीय युवतींच्या संघाकडून चाहत्यांना जेतेपद अपेक्षित आहे.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ७ बाद ११७ (त्रिशा घोंगडी ५२, मिथिला विनोद १७; फर्झाना इस्मिन ४/३१) विजयी वि.

बांगलादेश : १८.३ षटकांत सर्व बाद ७६ (जुरिया फर्डोस २२; आयुषी शुक्ला ३/१७, पारुनिका सिसोडीया २/१२)

सामनावीर : त्रिशा घोंगडी

भारताने या स्पर्धेत अपराजित राहताना ५ पैकी ४ सामने जिंकले. एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

त्रिशा घोंगडीने या स्पर्धेत ५ लढतींमध्ये सर्वाधिक १५९ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्लाने ५ सामन्यांत सर्वाधिक १० बळी मिळवले. त्यामुळे तिची ही भूमिका महत्त्वाची ठरली.

logo
marathi.freepressjournal.in