भारतीय युवतींची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक! उपांत्य सामन्यात इंग्लंडचा ९ गडी राखून फडशा; रविवारी जेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेशी गाठ

भारतीय युवतींच्या संघाने शुक्रवारी १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला.
भारतीय युवतींची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक! उपांत्य सामन्यात इंग्लंडचा ९ गडी राखून फडशा; रविवारी जेतेपदासाठी दक्षिण आफ्रिकेशी गाठ
एक्स @ICC
Published on

क्वालालंपूर : भारतीय युवतींच्या संघाने शुक्रवारी १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. पारुणिका सिसोदिया (२१ धावांत ३ बळी), वैष्णवी शर्मा (२३ धावांत ३ बळी) आणि आयुषी शुक्ला (२१ धावांत २ बळी) या डावखुऱ्या फिरकीपटूंच्या त्रिकुटाने केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर भारताने उपांत्य सामन्यात इंग्लंडचा ९ गडी आणि ३० चेंडू राखून फडशा पाडला.

मलेशिया (क्वालालंपूर) येथील ब्युमस ओव्हल स्टेडियमवर झालेल्या उभय संघांतील या उपांत्य लढतीत इंग्लंडला २० षटकांत ८ बाद ११३ धावांत रोखल्यावर भारताने १५ षटकांत अवघ्या एका फलंदाजाच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर कमलिनी गुनालनने ५० चेंडूंत नाबाद ५६ धावांची झुंजार अर्धशतकी खेळी साकारून भारताचा विजय पक्का केला. २०२३मध्ये झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकातही भारताने जेतेपद काबिज केले होते. त्यामुळे आता रविवारी ते सलग दुसरे विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी आतुर असतील. भारताची रविवारी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी गाठ पडेल.

निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय युवतींचा संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. साखळीत २ विजय मिळवल्यानंतर भारताने सुपर-सिक्स फेरीत ३ संघांना धूळ चारली. मग आता उपांत्य फेरीतील विजयासह भारताने सलग सहाव्या विजयाची नोंद केली. शुक्रवारी इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. मात्र ४ षटकांत ३७ धावा झालेल्या असताना पाचव्या षटकात पारुणिकाचे गोलंदाजीसाठी आगमन झाले. तिने तीन चेंडूंच्या अंतरात जेमिमा स्पेन्स (९) व ट्रडी जॉन्सन (०) यांना बाद केले. यानंतर डेव्हिना पेरीन (४५) व कर्णधार नोग्रोव्ह (३०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी रचली.

मात्र आयुषीने १२व्या षटकात पेरीनचा अडसर दूर केला आणि इंग्लंडचा संघ ढेपाळला. वैष्णवीने मधल्या फळीला गुंडाळून इंग्लंडची ३ बाद ८१ वरून ८ बाद ९२ अशी अवस्था केली. अखेरीस अमू सुरेनकुमार (नाबाद १४) व टॅली कोल्हमन (नाबाद ७) यांनी २१ धावांची भर घालून इंग्लंडला ११३ धावांपर्यंत नेले. भारताकडून पारुणिका व वैष्णवीने ३, तर आयुषीने २ बळी मिळवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या त्रिशा घोंगडीने पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात केली. तिने २९ चेंडूंत ३५ धावा फटकावतानाच कमलिनीसह ५४ चेंडूंत ६० धावांची सलामी नोंदवली. फोबे ब्रेटने त्रिशाला बाद केले. मात्र कमलिनीने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक साकारताना ८ चौकार लगावले. तिला मुंबईकर सानिका चाळकेने (नाबाद ११) उत्तम साथ दिली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची अभेद्य भागीदारी रचून १५व्या षटकात भारताचा विजय साकारला. कमलिनीनेच विजयी चौकार लगावून जल्लोष केला व सर्व भारतीय खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. पारुणिकाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून मात केली. भारताप्रमाणेच आफ्रिकासुद्धा या स्पर्धेत अपराजित आहे. त्यामुळे आता रविवारी दुपारी १२ वाजता रंगणाऱ्या अंतिम लढतीत आफ्रिका प्रथमच विश्वचषक उंचावणार की भारतीय संघ जेतेपद राखणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ८ बाद ११३ (डेव्हिना पेरीन ४५; पारुणिका सिसोदिया ३/२१, वैष्णवी शर्मा ३/२३, आयुषी शुक्ला २/२१) पराभूत वि.

भारत : १५ षटकांत १ बाद ११७ (कमनिली गुनालन नाबाद ५६, त्रिशा घोंगडी ३५, सानिका चाळके नाबाद ११)

सामनावीर : पारुणिका सिसोदिया

logo
marathi.freepressjournal.in