भारतीय महिलांचा वेस्ट इंडिजला दणका; १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाची दणक्यात सुरूवात

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या आक्रमणापुढे रविवारी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुरते लोटांगण घातले.
भारतीय महिलांचा वेस्ट इंडिजला दणका; १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाची दणक्यात सुरूवात
एक्स @ICC
Published on

क्वालालंपूर : भारतीय गोलंदाजांनी केलेल्या आक्रमणापुढे रविवारी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी पुरते लोटांगण घातले. अवघ्या ४५ धावांचे आव्हान भारतीय महिला संघाने ९ विकेट आणि ९४ चेंडू राखून सहज पार करत १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली.

डावखुरी फिरकीपटू परुनिका सिसोदिया (३/७) आणि आयुषी शुक्ला (२/६) यांच्यासह वेगवान गोलंदाज विजे जोशीथा (२/६) यांनी १३.२ षटकांत वेस्ट इंडिजला ४४ धावांत सर्वबाद करत मोहिमेची सुरुवात शानदार केली.

केनिका कॅसरने वेस्ट इंडिजतर्फे २९ चेंडूंत सर्वाधिक १५ धावा जमवल्या. सलामीवीर असाबी कॅलेंडरने १२ धावा जोडल्या. वेस्ट इंडिजच्या अन्य फलंदाजांना दुहेरी धावाही जमवता आल्या नाहीत. पाच फलंदाजांनी तर भोपळाही फोडला नाही. अवघ्या ४५ धावांचे लक्ष्य भारताने ४.२ षटकांत पार केले. ४ धावा जमवत सलामीवीर गाँगडी त्रिशा माघारी परतली. यष्टीरक्षक-फलंदाज जी कमालिनी (१३ चेंडूंत नाबाद १६ धावा) आणि सानिका चाळके (११ चेंडूंत नाबाद १८ धावा) यांनी भारताला सोपा विजय मिळ‌वून दिला.

logo
marathi.freepressjournal.in