विजयी हॅटट्रिकसह भारताच्या युवतींचा संघ सुपर-सिक्स फेरीत

मलेशिया येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय युवतींच्या संघाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.
विजयी हॅटट्रिकसह भारताच्या युवतींचा संघ सुपर-सिक्स फेरीत
एक्स @ICC
Published on

नवी दिल्ली : मलेशिया येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय युवतींच्या संघाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. गुरुवारी भारताने श्रीलंकेवर ६० धावांनी वर्चस्व गाजवून सुपर-सिक्स फेरीत प्रवेश केला.

क्वालाल्मपूर येथील ब्युमस ओव्हल मैदानावर झालेल्या अ-गटातील लढतीत निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद ११८ धावा केल्या. सलामीवीर त्रिशा घोंगडीने ४४ चेंडूंत ४९ धावांची खेळी साकारताना ५ चौकार व १ षटकार लगावला. तिला अन्य फलंदाजांकडून फारशी साथ लाभली नाही. सानिका चाळके (०), निकी (११), जोशिथा (१४) यांना छाप पाडता आली नाही. श्रीलंकेकडून लिमान्सा थिलरक्षणा, प्रामुदी मेशारा यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनीही कमाल केली आणि श्रीलंकेला २० षटकांत ९ बाद ५८ धावांतच रोखले. रश्मिका स्वानंदी (१५) हिला वगळता त्यांचा एकही फलंदाज १० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. भारतासाठी जोशिथा, शबनम शकिल आणि पारुनिका सिसोडिया यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. मात्र ४९ धावा करणारी त्रिशा सामनावीर पुरस्काराची मानकरी ठरली. भारताने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला, तर दुसऱ्या लढतीत मलेशियाला धूळ चारली होती. ३ सामन्यांतील ६ गुणांसह भारताने अ-गटात अग्रस्थान मिळवले. शनिवारपासून सुपर-सिक्स फेरी सुरू होईल.

संक्षिप्त धावफलक

भारत : २० षटकांत ९ बाद ११८ (त्रिशा घोंगडी ४९, मिथिला विनोद १६; प्रामुदी मेशारा २/१०) विजयी वि.

श्रीलंका : २० षटकांत ९ बाद ५८ (रश्मिका स्वानंदी १५; शबनम शकिल २/९, पारुनिका सिसोडिया २/७)

सामनावीर : त्रिशा घोंगडी

logo
marathi.freepressjournal.in