
नवी दिल्ली : डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने मंगळवारी अफलातून कामगिरीचा नजराणा सादर करताना हॅटट्रिक मिळवली. तसेच ४ षटकांत एका निर्धाव षटकासह फक्त ५ धावा देऊन तब्बल ५ बळी मिळवले. त्यामुळे भारतीय युवतींच्या संघाने १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. वैष्णवीने स्पर्धेच्या इतिहासातील आजवरचे सर्वोत्तम गोलंदाजी पृथक्करण नोंदवले.
क्वालालंपूर येथे झालेल्या अ-गटातील या लढतीत भारताने यजमान मलेशियाचा १० गडी आणि १०३ चेंडू राखून फडशा पाडला. मलेशियाला १४.३ षटकांत अवघ्या ३१ धावांत गुंडाळल्यावर भारताने २.५ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. रविवारी भारतीय युवतींनी वेस्ट इंडिजला ९ गडी राखून धूळ चारली होती. सलग दोन विजयांच्या ४ गुणांसह भारत-अ गटात अग्रस्थानी असून त्यांची गुरुवारी श्रीलंकेशी गाठ पडेल. श्रीलंकासुद्धा दोन सामन्यांत अपराजित आहे. मात्र भारताचे सुपर-सिक्स फेरीतील स्थान पक्के झाले आहे, असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. अन्य गटांत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांनी आपापले सर्व सामने आतापर्यंत जिंकले आहेत.
मंगळवारी प्रथम फलंदाजी करताना मलेशियाचा संघ वैष्णवी आणि आयुषी शुक्ला या डावखुऱ्या फिरकीपटूंपुढे पूर्णपणे ढेपाळला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडी धावसंख्या गाठता आली नाही. वैष्णवीने कर्णधार नूर सुहादा (१), नुरिमन हिदाया (२) यांना प्रथम बाद केले. मग १४व्या षटकात तिने नूर रोशन (३), नूर इस्मा (०) आणि सिती नझवा (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून हॅटट्रिक नोंदवली. आयुषीने ३ बळी मिळवून मलेशियाला ३१ धावांत गुंडाळण्यात मोलाचे योगदान दिले. त्यानंतर त्रिशा घोंगडी (१२ चेंडूंत नाबाद २७) आणि जी. कामलिनी (नाबाद ४) यांनी २.५ षटकांत ३२ धावा फटकावून भारताला विजय मिळवून दिला.
भारतीय गोलंदाजांनी वाईडच्या स्वरूपात १० अतिरिक्त धावा दिल्या. अन्यथा मलेशियाचा संघ ३१ पेक्षाही कमी धावांतच गारद झाला असता. महिला क्रिकेटमधील निचांकी धावसंख्येचा विक्रम मालदीव संघाच्या नावावर आहे. त्यांचा संघ २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध फक्त ६ धावांत गारद झाला होता.