चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा : १७ वर्षीय उन्नतीचा सिंधूला पराभवाचा धक्का; सात्विक-चिरागचा उपांत्य फेरीत प्रवेश

दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूची सुमार कामगिरीची मालिका कायम आहे. अनुभवी सिंधूला गुरुवारी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत भारताच्याच १७ वर्षीय उन्नती हुडाकडून पराभवाला सामोरे जावे लागले.
चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा : १७ वर्षीय उन्नतीचा सिंधूला पराभवाचा धक्का; सात्विक-चिरागचा उपांत्य फेरीत प्रवेश
Published on

नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूची सुमार कामगिरीची मालिका कायम आहे. अनुभवी सिंधूला गुरुवारी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत भारताच्याच १७ वर्षीय उन्नती हुडाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. त्याशिवाय पुरुषांमध्ये एच. एस. प्रणॉय, लक्ष्य सेन यांचेही आव्हान संपुष्टात आले, दुहेरीत मात्र सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मात्र उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

१,००० सुपर गुणांचा दर्जा असलेली ही स्पर्धा बुधवारपासून सुरू झाली. या स्पर्धेतील महिला एकेरीत सिंधूने पहिल्या फेरीत तीन गेममध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवला होता. मात्र गुरुवारी रोहतकच्या युवा उन्नतीसमोर सिंधू निष्प्रभ ठरली. उन्नतीने सिंधूला २१-१६, १९-२१, २१-१३ असे तीन गेममध्ये पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. २०२४पासून एकही स्पर्धा जिंकू न शकलेल्या सिंधूला २०२५ या वर्षातसुद्धा अद्याप छाप पाडता आलेली नाही. तब्बल ६ स्पर्धांमध्ये सिंधू दुसऱ्या फेरीच्या पुढे जाऊ शकलेली नाही. यावरूनच तिची कामगिरी किती ढासळलेली आहे, हे दिसते.

दरम्यान, उन्नतीने मात्र सिंधूला धूळ चारून अवघ्या विश्वाला इशारा दिला आहे. उन्नतीसमोर आता उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या तारांकित अकाने यामागुचीचे कडवे आव्हान असेल. उन्नतीने आतापर्यंत वरिष्ठ गटात दोन १०० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या स्पर्धांचे जेतेपद मिळवले आहे. मात्र यंदा प्रथमच ती चीन ओपनसारख्या १,००० गुणांचा दर्जा असलेल्या स्पर्धेत सहभागी झाली आहे.

पुरुष एकेरीत चायनीज तैपईच्या सहाव्या मानांकित टिन चेनने प्रणॉयला १८-२१, २१-१५, २१-८ असे तीन गेममध्ये नमवले. तसेच चीनच्या ली शी फेंगने भारताच्या लक्ष्यवर १४-२१, २४-२२, २१-११ अशी मात केली. त्यामुळे पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान समाप्त झाले.

पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग यांनी इंडोनेशियाच्या आठव्या मानांकित रॉली कोर्नाडो व बगास मौलाना यांना २१-१९, २१-१९ असे नेस्तनाबूत करून उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. त्यांची आता ओंग सिन आणि टिओ ई या मलेशियन जोडीशी गाठ पडेल. त्यामुळे आता दुहेरीत सात्विक-चिराग, तर एकेरीत उन्नती अशा दोन खेळाडूंवरच भारताचे स्पर्धेतील आव्हान टिकून आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक जिंकता आले नाही. तसेच २०२५मध्ये आतापर्तंय फक्त आयुष शेट्टीच्या रुपात भारताच्या एकमेव खेळाडूने एखादी स्पर्धा जिंकलेली आहे. आयुषने जूनमध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यावतिरिक्त मात्र भारतीय बॅडमिंटनपटूंचा संघर्ष कायम आहे.

तब्बल ७ वर्षांनी प्रथमच सिंधूला एखाद्या भारतीय खेळाडूने हरवले. यापूर्वी २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील अंतिम फेरीत सायना नेहवालने सिंधूला पराभूत केले होते.

logo
marathi.freepressjournal.in