इंग्लंडमध्ये पोहोचताच विराट,रोहित यांनी केली खरेदी

दोघांमध्ये बिनसल्याच्या तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे
इंग्लंडमध्ये पोहोचताच विराट,रोहित यांनी केली खरेदी

इंग्लंडमध्ये पोहोचताच विराट कोहली , रोहित शर्मा यांनी खरेदी केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दोघेही लंडनमध्ये एकत्रितपणे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे दोघांमध्ये बिनसल्याच्या तर्कविर्तकांना पूर्णविराम मिळाला आहे.

विराट कोहली इतर काही खेळाडूंसह गुरुवारी लंडनला रवाना झाला होता, तर रोहित शर्मा एका दिवसानंतर तिथे पोहोचला होता. हे दोघे वेगवेगळ्या दिवशी लंडनला गेल्याने दोघांमध्ये सर्व काही सुरळीत नसल्याच्या चर्चांचे पेव फुटले होते.

मागील वर्षी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. त्यासाठी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हा दौरा मध्येच सोडून खेळाडूंना मायदेशी परतावे लागले होते. या मालिकेतील राहिलेला एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून खेळविला जाणार आहे. त्यासाठी भारतीय कसोटी संघातील काही प्रमुख खेळाडू लंडनला पोहोचले आहेत. विराट, रोहित, जसप्रीत बुमराह आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासह इतर खेळाडू १ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटीसाठी तयारी करत आहे.

‘क्रिकेटमॅन२’ या ट्विटर अकाउंटवर विराट कोहली आणि रोहित शर्माचे दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये दोघेही एकाच चाहत्यासोबत दिसत आहेत. शिवाय, दोघांच्याही हातात खरेदीच्या पिशव्या दिसत आहेत. रोहित आणि विराट यांनी लंडनमध्ये एकत्र खरेदी सुरू केल्याचे या फोटोंवरून स्पष्ट होत आहे.

आयपीएलनंतर रोहित शर्मा पत्नी आणि मुलीसोबत मालदीवला गेला होता. त्यानंतर काही दिवसातच कोहलीसुद्धा पत्नी आणि मुलीसोबत मालदीवला गेल्याचे सोशल मीडिया पोस्टवरून समोर आले होते.

इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ २४ जून ते २७ जून या कालावधीत लिसेस्टरशायरविरुद्ध चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर १ जुलैपासून कसोटी सामना सुरू होईल. कसोटीनंतर ७ जुलैपासून तीन टी २० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. १२ जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल.

दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची टी २० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे या मालिकेत नव्हते. मालिकेतील शेवटचा सामना संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर लंडनला रवाना होतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in